पर्यावरण नुकसानीला
धर्म परवानगी देत नाही!
निवृत्त न्या. अभय ओक यांचे मत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः आपण धार्मिक व्यक्ती नाही; परंतु कोणताही धर्म पर्यावरणाचे नुकसान करण्याची परवानगी देत नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. अभय ओक यांनी एका कार्यक्रमादरम्यान नुकतेच व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयात इंटरॅक्टिव्ह लॉयर्स असोसिएशन फॉर वुमनने आयोजित ‘पर्यावरणीय न्याय’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या सहा फुटांवरील मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक जलाशयात होणार असल्याचा निकाल नुकताच उच्च न्यायालयाने दिला. त्याविरोधात अनेक पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर नद्या आणि समुद्रकिनारे प्रदूषित करणे हे धार्मिक स्वातंत्र्य म्हणून न्याय्य ठरू शकते का, असा प्रश्न न्या. ओक यांना विचारण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. आपण समुद्र आणि नद्यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांचा वापर गणपती विसर्जन, छट्पूजा, नवरात्री विसर्जनासाठी करतो. त्या वेळी आपण त्यांचे नुकसान करीत नाही का? मी एका विशिष्ट धर्माचा उल्लेख करीत नाही. कोणता धर्म निसर्गाचे नुकसान करण्याला समर्थन देत नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले.
---
कायद्याची धार बोथट
प्रत्येकाला प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. देशातील शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन कोलमडल्याची टीकाही न्या. ओक यांनी केली. एप्रिल २०२४ पर्यंत पर्यावरणीय नियमावलींचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद होती; परंतु अलीकडे कायद्यात सुधारणा करून तुरुंगवासाऐवजी आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली. त्यामुळे एका प्रभावी कायद्याची धार बोथट झाल्याचे मतही न्या. ओक यांनी व्यक्त केले.
----
विकसित शहर म्हणजे काय?
केवळ टॉवर, रस्ते आणि पूल बांधल्याने अर्थपूर्ण प्रगती होत नाही किंवा ही विकासाची व्याख्या असू शकत नाही. जेव्हा एखाद्या शहरात सामान्य माणसाला परवडणारी घरे, वैद्यकीय सुविधा, मुलांच्या शिक्षणासाठी परवडणाऱ्या सुविधा, प्रदूषणमुक्त हवा आणि जलस्रोत संरक्षित केले जाईल, तीच एका घटनात्मकदृष्ट्या विकसित शहराची व्याख्या असेल, असेही न्या. ओक यांनी शेवटी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.