उरणमध्ये गुंतवणूक जागृती कार्यशाळेला प्रतिसाद
उरण, ता. २६ (वार्ताहर) ः वीर वाजेकर ए. एस. सी. कॉलेज, फुंडे येथील वाणिज्य व बीएमएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि कृष्णा फाउंडेशनच्या सहकार्याने गुंतवणूक जागृती कार्यशाळा व वाणिज्य मंडळाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. प्रा. प्रांजल भोईर यांच्या स्वागतपर भाषणानंतर प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. पहिल्या सत्रात सेबी स्मार्ट प्रशिक्षक डॉ. प्रियांका राणी यांनी शेअर बाजार, सेबीच्या नियमावली, गुंतवणूकदारांचे अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात विनायक उप्पल यांनी डिमॅट खाती, म्युच्युअल फंड आणि डिजिटल गुंतवणुकीच्या फायद्यांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. दिक्षिता म्हात्रे, प्रा. भूषण ठाकूर, प्रा. तन्वी कोळी आणि इतर सहकाऱ्यांनी केले.
.................
खोपटे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तात्पुरते स्थगित
उरण (वार्ताहर) ः खोपटे गावातील ऑल कार्गो प्रकल्पात स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी गेट बंद आंदोलन पुकारले होते, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने ऑगस्टच्या पहिल्या सोमवारी बैठक घेण्याचे कंपनीकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने हे आंदोलन चालवले होते.
.............
फुंडे डोंगरी, पाणजे येथील रस्त्यांची दुरवस्था
उरण (वार्ताहर) ः फुंडे-डोंगरी-पाणजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांचे प्राण धोक्यात येत असल्याने अखिल आगरी समाज परिषदेच्या अध्यक्षा सीमा घरत यांनी संबंधित प्रशासनाकडे रस्त्यांचे त्वरित नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे. उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे या तालुक्यात दळणवळण यंत्रणा वाढली आहे. प्रवाशी वाहतूक, मालाची रेलचेल करणाऱ्या वाहनांसाठी सिडको, जेएनपीए बंदर प्रशासन, नॅशनल हायवे अथॉरिटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे केली जात आहेत; मात्र भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यातील रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था होत आहे. यावर्षी पावसाळ्यात तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खड्डेयुक्त रस्त्यातून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांना अपघातात आपले प्राण गमवावे लागत आहेत. सध्या पावसाळ्यात फुंडे डोंगरी, पाणजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे सिडको, जेएनपीए बंदर प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे बुजवून नव्याने रस्त्याची कामे हाती घ्यावी, अशी मागणी आगरी समाज परिषदेच्या अध्यक्षा सीमा घरत यांनी केली आहे.
.............
विद्यार्थ्यांकडून तळोजा उद्यानात वृक्षलागवड
खारघर (वार्ताहर) ः सिल्वर पार्क सोसायटीतील विद्यार्थ्यांनी तळोजा वसाहतीमधील उद्यानात आंबा, जांभूळ, पेरू, बदाम यासारख्या झाडांची लागवड केली. हा उपक्रम अतुल पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. रहिवाशांनी रोपांचे संरक्षण आणि संगोपन करण्याचे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.