अकरावीच्या वर्गांना सुरुवात
अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांत संभ्रम
मुंबई, ता. ११ : अकरावीच्या पाचव्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (ता. ११) राज्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या वर्गांना सुरुवात झाली असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
अकरावीच्या ओपन टू ऑल या पाचव्या विशेष फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कॅप प्रवेशातून तीन लाख १० हजार ७०८, कोट्यातील प्रवेशातून चार हजार ६०३ अशा एकूण तीन लाख १५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी शुक्रवारपर्यंत (ता. ८) संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेतले होते. यात मुंबई विभागातील कॅप प्रवेशातील ६० हजार २६७ तर कोट्यातील दाेन हजार ९५६ अशा एकूण ६३ हजार २२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील एकूण नऊ हजार ५२५ कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीचे वर्ग सुरू झाले आहेत, अशी माहिती संचालक डॉ. पालकर यांनी दिली.
अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांत २१ लाख ५० हजार १३० जागांची प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी राज्यातून १४ लाख ५५ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत ११ लाख ९४ हजार ९१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याचेही संचालकांनी सांगितले.
-----
विशेष फेरी मंगळवारी
आतापर्यंतच्या फेऱ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळू शकला नाही, त्यांच्या प्रवेश आणि वर्गाबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. असंख्य विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही प्रवेश मिळू शकला नाही, तर खुल्या फेरीसह अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातील शेकडो जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत. असे असताना प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांत चिंतेचे वातावरण आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असल्याने रिक्त राहिलेल्या जागांवरील पुढील विशेष फेरीचे नियोजन मंगळवारी जाहीर केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.