खड्ड्यांवरून संतप्त नागरिकांची बॅनरबाजी
“आम्हाला असा सुंदर रस्ता दिल्याबद्दल शतशः आभार” – प्रशासनाला खोचक टोला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोडची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून, गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात अखेर नागरिक रस्त्यावर उतरले. खड्ड्यांतून प्रवास करताना त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत खोचक आणि उपरोधिक पद्धतीने बॅनर लावून संताप व्यक्त केला आहे. या बॅनरमध्ये “आम्हाला असा सुंदर रस्ता दिल्याबद्दल खासदार, आमदार, नगरसेवक आणि महापालिकेची शतशः आभार असे लिहून, रस्त्याच्या दयनीय स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बॅनर परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, नागरिकांच्या या संतप्त प्रतिक्रियेने प्रशासनावर दबाव वाढला आहे.
यंदा पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्यामुळे खड्ड्यांची समस्या लवकर सुरू झाली. नवापाडा आणि सुभाष रोडसारखे मुख्य रस्ते पावसाळ्यापूर्वीच सुरू असलेल्या विविध कामांमुळे खराब झाले. पावसात रस्त्यांवर खड्डे पडले आणि ते दिवसेंदिवस अधिक खोल आणि धोकादायक होत गेले. पावसाने सध्या उघडीप दिली असतानाही खड्डे बुजवण्याचे काम संथ गतीने सुरू आहे आणि बहुसंख्य रस्त्यांवर काम झालेले नाही. विशेषतः सुभाष रोडवरील खड्डे अद्यापही जैसे थे आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संयम सुटला असून, त्यांनी बॅनरबाजीचा मार्ग अवलंबला आहे. गेली अनेक वर्षे मंत्री, कलाकार, नागरिक हे आवाज उठवित आहेत, मात्र पालिका प्रशासन ढिम्म आहे. यंदाच्या पावसाळ्यातदेखील या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मे तसेच जून महिन्यात रस्त्यावर खड्डे पडून ते खड्डे मोठे मोठे होत गेले. जुलै महिन्यात संतोष मिरकुटे या रिक्षाचालकाने स्वतः पुढाकार घेत सुभाष रोडवरील खड्ड्यांत डेब्रिज आणून टाकले आणि खड्डे बुजविले. आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता विरोधी पक्षांनी यावर आपली पोळी भाजून घेतली.
टिळक रोड (डोंबिवली पूर्व) आणि सुभाष रोड (डोंबिवली पश्चिम) हे शहराचे महत्त्वाचे रस्ते अजूनही डांबरी अवस्थेत आहेत. प्रत्येक पावसाळ्यात हे रस्ते खड्ड्यांमुळे वाहतूक अडथळ्यांमुळे ओसंडून वाहतात. गेल्या काही वर्षांपासून मंत्री, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी आवाज उठवला आहे, तरीही महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. राजकीय पक्षांनीही आंदोलन केले आहे. मनसे व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करत अनोखा निषेध नोंदवला होता. नागरिकांनीही याला पाठिंबा दिला होता. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे, मात्र तरीही सुभाष रोडसारखा एक प्रमुख रस्ता दुरुस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करत आहे. यानिमित्ताने प्रशासनाला जाग येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खासदार-आमदारांवर उपरोधिक टीका
नागरिकांनी लावलेल्या बॅनरमध्ये असेही नमूद केले आहे की, “हीच का आपल्या मतांची किंमत?” तसेच, “चिरीमिरी आणि प्रलोभनाला बळी पडू नका” असा इशाराही नागरिकांना देण्यात आला आहे. बॅनरमध्ये प्रभाग क्रमांक ५८ आणि ५९ चे स्थानिक नगरसेवक यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या आधी अशा प्रकारचे बॅनर रातोरात काढण्यात आले होते. काही ठिकाणी ते फेरीवाल्यांच्या छत्रीखाली लपवून ठेवण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवर स्पष्टपणे लिहिले आहे की, “नार्मद बनून हा बॅनर काढू किंवा फाडू नका, तर रस्ता चांगला करून दाखवा.” ही टीप सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.