स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना पालघरमध्ये अभिवादन
पालघर, ता. १४ (बातमीदार) : ब्रिटिश साम्राज्यविरोधी चले जाव चळवळीत भाग घेतल्यामुळे पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्यसैनिकांना हुतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांचे पुण्यस्मरण व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (ता. १४) पालघर येथील हुतात्मा स्तंभावर आदरांजली कार्यक्रम आयोजित केला होता. हे वीर १९४२ मध्ये झालेल्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर हुतात्मा स्तंभाजवळ मोठ्या संख्येने नागरिक, शालेय विद्यार्थी आणि विविध पदाधिकाऱ्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, माजी आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, तहसीलदार रमेश शेंडगे, पालघर नगर परिषद माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, तसेच हुतात्म्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
पाच हुतात्म्यांचे स्मरण
काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी)
गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव)
रामप्रसाद भीमाशंकर तिवारी (पालघर)
सकूर गोविंद मोरे (सालवड)
रामचंद्र महादेव चूरी (मुरबे)
तिरंग्याची खास ओळख
हुतात्मा गोविंद ठाकूर यांच्या रक्ताने माखलेला तिरंगा, जो सध्या पालघर नगर परिषदेकडे जपून ठेवण्यात आलेला आहे, तो आज या समारंभात हुतात्मा स्तंभाच्या ठिकाणी ठेवण्यात आला. या तिरंग्याच्या उपस्थितीत या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पालघर जिल्हा व नागरिकांसाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून देणारा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला. प्रत्येक वर्षी या दिवशी त्यांना अभिवादन करणे, त्यांच्या शौर्याचा सन्मान करणे आणि स्वातंत्र्याची किमया जपणे आवश्यक असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.