पावसाळ्यात खेळाडूंमध्ये त्वचेच्या संसर्गाचे प्रमाण वाढले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पावसाळ्यातील दमट हवामान, सतत पडणारा पाऊस आणि ओलसर कपडे यामुळे बुरशीजन्य त्वचा संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः खेळाडूंमध्ये पायाला संसर्ग (टिनिया पेडिस) व गजकर्ण (टिनिया कॉर्पोरिस) यांसारख्या संसर्गांची संख्या लक्षणीय वाढली असून, त्वचारोगतज्ज्ञांच्या मते २५ ते ६५ वयोगटातील प्रत्येक १० पैकी पाच रुग्णांना हे त्रास जाणवत आहेत.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा इसा चौसे यांनी सांगितले की, संसर्ग प्रामुख्याने पायाच्या बोटांमधील त्वचेवर होतो. सतत मोजे घालणे, ओल्या जागी अनवाणी चालणे आणि पायांची योग्य स्वच्छता न राखणे यामुळे हा संसर्ग होतो. खाज, सूज, त्वचेवर भेगा पडणे आणि दुर्गंधी ही याची लक्षणे आहेत. वेळीच उपचार न केल्यास हा पायाच्या नखांवर किंवा शरीराच्या इतर भागांवर पसरू शकतो, तर गजकर्ण मात्र त्वचेच्या संपर्कातून किंवा संक्रमित वस्तूंचा वापर करून पसरतो. गोलसर लाल पुरळ, खाज आणि खपली ही याची लक्षणे आहेत. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत बुरशीजन्य संसर्गात १५ टक्के वाढ झाल्याचे त्या म्हणाल्या.
झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील डॉ. सुरभी देशपांडे यांनी सांगितले की, दमट हवामान व ओले कपडे हे या संसर्गांसाठी पोषक वातावरण असते. संसर्गामध्ये पायाच्या बोटांमधील त्वचा प्रभावित होते, तर गजकर्ण शरीराच्या कुठल्याही भागावर गोलसर, लालसर चट्ट्यांच्या स्वरूपात दिसते. हे संसर्ग टॉवेल, मोजे किंवा थेट त्वचेच्या संपर्कातून सहज पसरतात.
त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला
तज्ज्ञांनी त्वचा कोरडी ठेवणे, ओले कपडे त्वरित बदलणे, वैयक्तिक वस्तू शेअर न करणे, बुरशीजन्य औषधे वेळेवर वापरणे आणि लक्षणे वाढल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. योग्य काळजी घेतल्यास हे संसर्ग टाळता आणि लवकर बरे करता येतात.