दहीहंडीतून मांडणार संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : दरवर्षीप्रमाणे यंदाही आयडियल गल्लीतील दहीहंडी उत्सवासाठी शनिवारी (ता. १६) मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळणार आहे. यापूर्वी शिवसागर गोविंदा पथकाकडून मानवी मनोरा रचनेत विविध संकल्पनांवर आधारित देखाव्याचे सादरीकरण केले गेले आहे. यंदाही पथकाकडून तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडला जाणार आहे.
या देखाव्याचे सादरीकरण सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. या सादरीकरणातून महाराजांच्या शौर्याचा इतिहास सामाजिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयडियल बुक कंपनी (दादर) यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री साई दत्त मित्र मंडळ आणि बाबूशेठ पवार मित्रमंडळ यांच्या सहकार्याने आयडियल सेलिब्रिटी व पर्यावरणपूरक दहीहंडी उत्सव २०२५ साजरा होत आहे.
महाराष्ट्रात महिला दहीहंडी, सेलिब्रिटी दहीहंडी आणि देखावा सादरीकरण दहीहंडीची सुरुवात आयडियच्या गल्लीत झाली. यंदाचे पुरुष दहीहंडीचे ५१वे वर्ष, महिला दहीहंडीचे ३२वे वर्ष, सेलिब्रिटी दहीहंडीचे २३वे वर्ष आणि देखावा सादरीकरण दहीहंडीचे चौथे वर्ष आहे. महिला आणि पुरुष गोविंदा पथकांच्या विशेष सलामीसह पर्यावरणपूरक दहीहंडी उत्सवाची सुरुवात होईल.
दिव्यांग व अंध बंधू-भगिनींचे गोविंदा पथकाचे मनोरे हे या दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे.