बोईसर येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम
बोईसर, ता. १४ (बातमीदार) : ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, पालघर व टाटा स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव-बोईसर येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश डेंगी, टायफॉईड, कॉलरा व इतर जलजन्य आजारांविषयी जनजागृती करणे हा होता. स्वयंसेवक, स्थानिक नागरिक व कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागातून किनाऱ्यावरील प्लॅस्टिक, घनकचरा व इतर प्रदूषक पदार्थ दूर करण्यात आले, ज्यामुळे किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य पुनर्स्थापित झाले व स्थानिक तसेच पर्यटकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रतिनिधींनी स्वच्छतेत जनसहभागाची गरज अधोरेखित केली आणि अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या रोगांपासून बचावासाठी समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने राबविलेली ही मोहीम एकतेचे, नागरी जबाबदारीचे आणि स्वच्छ व निरोगी भारत घडविण्याच्या बांधिलकीचे प्रतीक ठरली आहे.