मदर डेअरीच्या लढ्यात मनसे मैदानात
राज ठाकरेंनी दिले मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे कुर्ल्यातील मदर डेअरी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या नोटिसांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विस्थापनाची मुदतवाढ, वृक्ष कत्तल, बोटॅनिकल गार्डन आणि मदर डेअरी जागा हस्तांतरण या संदर्भात चर्चा करण्यात आली.
धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे कुर्ला मदर डेअरीची २५ हजार कोटी किमतीची २१ एकर जमीन अगदी कवडीमोल भावात ५७ कोटींना अदानी समूहाला शासन निर्देश काढून देण्यात आली. या निर्णयानंतर सातत्याने या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याच्या नोटीसा देण्यात येत आहेत. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी आणि लोकचळवळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कुर्ला विधानसभा विभागाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी मदर डेअरी कर्मचाऱ्यांची राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून आणली.
हस्तांतरणाचा निर्णय रद्द करावा
घर खाली करण्यासाठी शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत मुदतवाढ द्यावी, जेणेकरून पर्यायी व्यवस्था करण्यास वेळ मिळेल. मदर डेअरीच्या जागेतील ४० ते ५० वर्षे जुन्या तब्बल १२०० झाडांची होणारी कत्तल तात्काळ थांबवून, त्या ठिकाणी बोटॅनिकल गार्डन उभारावे. कोट्यवधींची किंमत असलेली मदर डेअरीची जमीन अदानी समूहाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करावा.
पुनर्विकासाच्या नावाखाली जमीन अदानी समूहाला
पुनर्विकासाच्या नावाखाली कुर्ला आणि मुंबईतील इतर भागात धारावीकरांना जबरदस्तीने विस्थापित करून, धारावीची मोक्याची जमीन अदानी समूहाला देण्याचा सरकारचा डाव स्पष्ट झाल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. स्थानिक पायाभूत सुविधांवर आधीच ताण असताना, नव्याने वाढणारी लोकसंख्या, वाढलेले प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि वाहतूक कोंडी या समस्या कुर्ल्याला अधिकच त्रासदायक ठरणार असल्याचे कुर्ल्यातील नागरिकांनी सांगितले.
राज ठाकरेंचा सकारात्मक प्रतिसाद
राजसाहेब ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत, या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. कुर्ल्यातील मदर डेअरीचा लढा आता मनसेच्या थेट पाठिंब्याने अधिक जोमाने लढला जाणार असल्यामुळे बाधितांच्या आशा पल्लवित व कुर्ल्यातील नागरिकांच्या झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.