बीआयटी चाळीतील पुनर्विकसित खोल्यांमध्ये घुसखोरी
पालिकेच्या मालमत्ता विभागाचा कारवाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : इमामवाडा येथील बीआयटी चाळ एक ते पाच या चाळींचा पुनर्विकास करून तयार करण्यात आलेल्या इमारतींमधील खोल्यांत भाडेकरू अनधिकृतपणे राहात असल्याबद्दल पालिकेच्या बी मालमत्ता विभागाने खोल्यांचा ताबा सोडा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणाऱ्या नोटिसा तेथील रहिवाशांना पाठविल्या आहेत.
मालमत्ता अधिकारी बी विभाग यांच्या अखत्यारीत असलेल्या इमामवाका रोड येथील बीआयटी चाळ क्र. एक ते पाच या चाळींचा पुनर्विकास केल्यानंतर उभ्या राहिलेल्या इमारतींमध्ये महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे वास्तव्यास आहात. महापालिकेच्या प्रचलित धोरण व परिपत्रकानुसार पुनर्विकसित इमारतीमध्ये सदनिकांचे वाटप संबंधित मालमत्ता अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. परंतु मालमत्ता अधिकारी बी विभाग यांच्यामार्फत अद्यापर्यंत कोणतेही वाटपपत्र तसेच ताबा दिलेला नसतानाही भाडेकरूंनी घुसखोरी केले असल्याचे आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून, पालिकेच्या धोरणाविरुद्ध असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्यामुळे पुनर्विकसित खोलीचा ताबा ३० दिवसांच्या आत मालमत्ता अधिकारी बी विभाग यांना देण्यात यावा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.