मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मालमत्ता कराच्या सुधारित देयकांच्या छपाईचे कामकाज काही तांत्रिक कारणास्तव वाढले आहे. टपाल खात्याच्या प्रणाली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमुळे देयकांच्या वितरणास विलंब होत आहे. मालमत्ताधारकांना देयकाचा भरणा करण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे पहिल्या सहामाहीचा मालमत्ता कर भरण्यासाठी अधिदान करण्यासाठी वाढीव कालावधी देण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पहिल्या सहा महिन्यांकरिता मालमत्ता कराचा भरणा कालावधी १३ ऑगस्टपर्यंत होता. यासाठी आता प्रशासकीय विभागनिहाय (वॉर्ड) वाढीव कालावधी देत मालमत्ता कर भरण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. के पूर्व, आर उत्तर, एल, एन, एस आणि टी विभागासाठी (वॉर्ड) १ डिसेंबर हा अंतिम दिनांक देण्यात आहे. अंतिम दिनांकानंतर थकीत देयकांना दंड आकारण्यात येईल, असे पालिकेने म्हटले आहे.