मिरा-भाईंदरच्या दहीहंडी उत्सवात स्पेनच्या गोविंदांचे आकर्षण
भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात यावर्षी विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बक्षिसांसाठी राजकीय पक्षांमध्ये चांगलीच चढाओढ लागली आहे, मात्र यावर्षी पहिल्यांदाच भाईंदर पूर्व येथील नवघर नाक्यावर होणाऱ्या उत्सवात स्पेनमधील खेळाडू सहभागी होणार असून, त्यांचे कौशल्य महोत्सवाचे खरे आकर्षण ठरणार आहे.
प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि नवघर नाक्याची मानाची हंडी वंदना विकास पाटील जनहित संस्थेतर्फे मिरा-भाईंदर शहरात पहिल्यांदाच ‘संस्कृतीची दहीहंडी २०२५’ साजरी करण्यात येणार आहे. भाईंदर पूर्व येथील नवघर मराठी शाळेच्या मैदानात हा उत्सव रंगणार आहे. या उत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे स्पेनमधील मॅरेक्स दे सॅाल्ट या संघाचे १११ खेळाडू (कॅसलर). मिरा-भाईंदर शहरात पहिल्यांदाच येणारे स्पेनचे गोविंदा आठ थरांची सलामी देणार आहेत. याव्यतिरिक्त प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रुपये पाच लाख व आकर्षक चषक, प्रत्येक नऊ थर लावणाऱ्या पथकास रुपये एक लाख व आकर्षक चषक तसेच आठ, सात, सहा व पाच थर लावणाऱ्या पथकांसाठी विशेष रोख पारितोषिके व चषक अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच महिला गोविंदा पथकांसाठी विशेष बक्षिसे असणार आहेत.
या महोत्सवात सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सर्व पथकांसाठी अपघात विमा काढण्यात येणार असून, लाइफ जॅकेट, हेल्मेट उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रशिक्षित डॉक्टर, रुग्णवाहिकादेखील तैनात असणार आहेत. महोत्सवाला चित्रपट क्षेत्रातील तारेतारका व राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. भविष्यातील पिढीवर उत्तम खेळाचे संस्कार करणाऱ्या प्रो-गोविंदा संकल्पनेचा आणि परंपरेचा व संस्कृतीचा गौरव ‘संस्कृतीची दहीहंडी २०२५’ च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती आयोजक परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.