पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : भाईंदर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने बुधवारी (ता. १३) रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. ऋतिक चव्हाण असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ऋतिक चव्हाण हे भाईंदर पश्चिमेकडील बेकरी गल्लीत आईसह राहात होते. दीड वर्षापूर्वीच ते पोलिस दलात रुजू झाले होते. सध्या ते भाईंदर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ऋतिक यांची आई कामानिमित्त गावी गेली होती. त्यामुळे ते एकटेच घरी होते. रात्रीच्या वेळी त्यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ऋतिक यांनी आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती भाईंदर पोलिसांनी दिली.