१० दिवस बेपत्ता असलेली बोट अर्नाळा किनाऱ्यावर सुखरूप परतली
विरार, ता. १४ (बातमीदार) : अर्नाळा येथील अमर वचन नावाची मासेमारी बोट खोल समुद्रात गेल्यानंतर १० दिवसांपासून बेपत्ता होती. काही कारणांमुळे बोटीचा जमिनीशी संपर्क तुटल्यामुळे बोटीवरील १४ खलाशांचे नातेवाईक खूपच धास्तावले होते. ते सातत्याने बोटीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, पण यश मिळत नव्हते. गुरुवारी सकाळी अखेर या बोटीचा संपर्क झाला आणि बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप असल्याची माहिती मिळाली. यावर खलाशी आणि मालकांच्या नातेवाइकांनी मोठा श्वास सोडला.
अर्नाळा येथील शंकर भिकू म्हात्रे यांची अमर वचन ही बोट मासेमारीसाठी १० दिवसांपूर्वी खोल समुद्रात गेली होती. बोटीचा संपर्क तुटल्यामुळे खलाशांचे नातेवाईक चिंतेत होते. या बोटीवर एकूण १४ खलाशी होते. मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनाला फ्युएल पुरवठा होत नव्हता, त्यामुळे ते चालू होत नव्हते, परंतु अथक प्रयत्नानंतर इंजिन सुरू झाल्यानंतर बोटीचा संपर्क पुन्हा जमिनीशी झाला. बोटी समुद्रकिनारी गुरुवारी दुपारी ३ वाजता परतली.
खलाशांनी सांगितले की, घरच्यांना सुखरूप असल्याची माहिती देताना त्यांना खूप आनंद झाला. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीच्या हंगामात ही बोट पहिल्यांदाच समुद्रात गेली होती. ही घटना घडल्याने खलाशी आणि त्यांचे नातेवाईक चिंतेत होते, पण सुरक्षित परतल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते.