ठाणे घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी
भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटामध्ये शिल्लक राहिलेले रस्ता दुरुस्तीचे काम १५ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी घोडबंदर ते ठाणे मार्गावर १४ ऑगस्ट रात्री १२ वाजल्यापासून १८ ऑगस्ट पहाटे ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. हलक्या वाहनांची वाहतूक या मार्गावर टप्प्याटप्प्याने मार्गस्थ करण्यात येणार आहे. परिणामी गायमुख घाटात वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ठाणे-घोडबंदर रस्त्याचा वापर टाळावा व पर्यायी मार्गाचा उपयोग करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. वरसावे पोलिस चौकी ते गायमुख घाटदरम्यान कोणीही उलट्या दिशेने वाहने नेऊ नयेत अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.