करंजाडे जलमय
पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अडचण
पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असणाऱ्या करंजाडे वसाहतीमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचत आहे. साडेतीन मीटरखाली असणाऱ्या कळंबोलीचीही तीच स्थिती होती, मात्र महापालिका प्रशासनाने उपाययोजना करून दोन दशकांनंतर या ठिकाणी पुरावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे, परंतु करंजाडे आता कळंबोलीच्या वाटेवर आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिडकोने करंजाडे वसाहत विकसित केली. साडेबारा टक्के योजनेवर ही कॉलनी उभी राहिली आहे. बाजूलाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोठा भराव करण्यात आला आहे. त्याचबरोबर जेएनपीए हायवे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यातील बाधितांचे पुनर्वसन आजूबाजूला करण्यात आले आहे, परंतु पावसाळ्यामध्ये ही वसाहत जलमय होण्याचे संकट उभे राहिले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या नोडमध्ये पाणी साचून राहत आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित होत असल्याचे गेल्या तीन दिवसांपासून दिसून आले. कळंबोलीतील परिस्थिती आता करंजाडेमध्ये होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
भरावामुळे पूरजन्य परिस्थिती!
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जवळपास आठ मीटर भराव करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कांदळवन नष्ट झालेले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पनवेल परिसरात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. करंजाडे हे नैसर्गिकदृष्ट्या खाली राहिले असल्याने साहजिकच या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे आणि पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे.
डोंगराचे पाणी करंजाडेत!
महात्मा फुले कॉलेजच्या बाजूला असणाऱ्या डोंगरावरून येणारे पाणी थेट करंजाडे वसाहतीत येत आहे. त्या पाण्याला योग्य मार्ग न मिळाल्याने पाणी साचत आहे. यामुळे वाहनेसुद्धा चालवता येत नाहीत.
सिडकोचे नियोजन चुकीचे!
गवळीवाडा येथे पहिला नाला होता, मात्र त्याच्यात पाइप टाकून वरती रोड करण्यात आला. यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन हे पाणी वसाहतीमध्ये घुसल्याचे एकंदरीत करंजाडेकरांचे म्हणणे आहे.