खड्ड्यांचे ‘स्मार्ट’ शहर
नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांवर मनस्ताप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. अशातच नवी मुंबई महापालिकेकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलेले नाही. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, बेलापूर परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे सुनियोजित शहराच्या नावलौकिकालाच धक्का लागला आहे.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना होते. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे घरगुती गणपती बसवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. २७ ऑगस्टला गणरायाची स्थापना होणार आहे. त्याकरिता सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती आगमनास सुरुवात झाली आहे. गणेश मंडळांच्या मूर्तीचे आकार मोठे असल्याने खराब रस्त्यांवरून कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे. नेरूळ आणि सीवूड्स परिसरात खड्डे पडून रस्ते खराब झाले आहेत.
----------------------------------
सीवूड्स ः एलॲण्डटी उड्डाणपुलाहून अक्षर इमारतीच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गिकांवरील रस्ता पूर्णपणे खराब होऊन गेला आहे. डी-मार्ट परिसरातील काँक्रीटीकरणाचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. सीबीडी सेक्टर २९ रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शिरवणे आणि दारावे या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
बेलापूर ः रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. नेरूळमध्येही सेक्टर २ येथे अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. सानपाडा रेल्वेस्थानकासमोर व जुईनगर सेक्टर २५ या नोडमध्येही स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.
कौपरखैरणे ः सेक्टर १९ आणि घणसोली सेक्टर १० घरोंदासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या भागातील रहिवासी परिसरात शेकडो ठिकाणी गणरायाची स्थापना केली जाते. वाशीतील महापालिका रुग्णालयासमोरील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या ठिकाणी खड्ड्यातून वाट काढणे वाहनचालकांसाठी अडचणीचे झाले आहे.
----------------------------------
दोन महिन्यांपूर्वीचा खर्च पाण्यात
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अभियांत्रिकी विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून सीवूड्स सेक्टर ५०, सेक्टर ४८ या भागातील रस्त्यांवर डांबराचा थर टाकला होता. नेरूळ, जुईनगर, सानपाडा आणि वाशी या भागातील रस्त्यांचीही दुरुस्ती केली होती. अवघ्या दोन महिन्यांत रस्त्यांची दुर्दशा झाली. सर्व रस्त्यांवरील डांबराचा थर निघून गेला.
------------------------------------
नवी मुंबई महापालिकेने तीन वर्षांत डांबरी रस्ते, सिमेंटचे रस्ते निर्माण करणे, रस्त्यांच्या दुरुस्तीवर किती खर्च केला आहे याचा लेखाजोखा श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवायला हवा. प्रशासकीय राजवट म्हणजे सरंजामशाही नव्हे.
- कपिल कुलकर्णी, सदस्य, सजग नागरिक मंच, नवी मुंबई
------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.