मुंबई

रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकरांची कोंडी

CD

रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकरांची कोंडी
अंतर्गत रस्‍त्‍यांची अवस्‍था बिकट
मुंबई, ता. २३ ः आठवडाभर मुंबईमध्ये झालेल्या पावसामुळे रस्‍त्‍यांची अवस्‍था बिकट झाली आहे. गणेशोत्‍सव तीन दिवसांवर आला असल्‍याने आता हे खड्डे कधी भरणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे. मुंबईतील मुख्य रस्त्यांची स्थिती चांगली आहे; मात्र अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. काही ठिकाणी तर काही दिवसांपूर्वी भरलेले खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत.  मुंबईतील रस्‍त्‍यांच्या सद्यःस्‍थितीचा ‘सकाळ’ने घेतलेला आढावा.


मयूर फडके
खड्डे बुजवूनही सांताक्रूझ-वाकोला उड्डाणपुलाची अवस्‍था जैसे थे!
कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यातील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सुरुवातीला माहीम जंक्शनला भला मोठा खड्डा पडला आहे. वांद्रेतील हिल रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले होते. सांताक्रूझ-वाकोला उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर पालिका प्रशासनाने काही खड्डे बुजवण्याचे काम केल्याचे पाहायला मिळत होते. तरीही उड्डाणपुलावर दोन्ही मार्गिकांवर खड्डे अजूनही पाहायला मिळत आहेत.

अनेक वर्षे दुचाकी आणि चारचाकीने प्रवास करतो. गल्लीबोळापासून ते महामार्गापर्यंत सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. आम्ही कर भरूनही अशाप्रकारचे रस्ते मिळणार असतील तर आम्ही कर का भरावा?
- प्रशांत मिरजुले, एक प्रवासी

मिलिंद तांबे
पूर्व मुक्‍त मार्गाची दयनीय अवस्था
पूर्व मुक्‍त मार्ग हा चेंबूर ते सीएसएमटीपर्यंत जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. काँक्रीट रस्ता असूनही सध्या ठिकठिकाणी खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, ९० फूट डी. पी. रोड, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्गाच्या प्रवेशद्वारांवर खड्ड्यांनी वाहनचालकांचे हाल केले आहेत. वडाळा येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चौकात तब्बल पाच फूट लांब आणि दोन-अडीच फूट खोल खड्डा पडला असून त्‍यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.

पूर्व मुक्‍त मार्गावरील खड्डे हा जीवघेणा सापळा बनला आहे. खड्ड्यांमुळे सारखा ब्रेक मारून गाडीही खराब होते. अपघात घडून जीवितहानी होण्याआधी महापालिकेने तातडीने दुरुस्ती करावी.
- संजय चौहान, वाहनचालक

नितीन जगताप
एस. व्ही. राेडवर अपघाताची भीती
शहरातील रस्‍त्‍यांचा विचार केल्‍यास एस. व्ही. रोडवर खड्ड्यांचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसत आहे. पालिकेने बसवलेल्‍या गटारांच्या झाकणांजवळदेखील खड्डे भरले आहेत. त्‍यामुळे येथे अपघाताची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. नागरिकांची व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने खड्डे भरावेत, अशी मागणी होत आहे.

 मी डिलिव्हरी बॉयचे काम करतो. अनेकदा दुचाकी खड्ड्यांमुळे घसरते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. पालिकेने तत्काळ खड्डे बुजविणे आवश्यक आहे.
- प्रवीण सावंत, दुचाकीचालक

विष्णू सोनावणे 
विक्रोळी कन्नमवारनगरातील रस्त्यांची दैना
विक्रोळी येथील कन्नमवारनगरातील रस्त्यांची दैना झाली आहे. या विभागातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. वाहनचालकांना या खड्ड्यांतून गाड्या चालवाव्या लागत आहेत.
विक्रोळी एलबीएस रोडवर ठिकठिकाणी अशीच परिस्‍थिती आहे. सीसी रोडलगत टाकलेली डांबर बाहेर येत खड्डे पडले आहेत. वाहतूक कोंडी आणि खड्डे यामुळे नागरिकांची या रस्त्यावर दमछाक होते.

विक्रोळी येथील कन्नमवारनगर मधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने खड्डे मोठमोठे झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष नाही. नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय.
- विनय यादव, स्थानिक

संजीव भागवत 

मानखुर्द, शिवाजीनगरमध्ये खड्ड्यांचे साम्राज्‍य
मानखुर्द शिवाजीनगर आणि गोवंडी परिसरात मुख्य रस्त्यांचा काही अपवाद वगळता, बहुतांश भागांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मुख्य रस्त्यांवर आणि काही चौकांत  खड्ड्यांमध्ये डांबरीकरण आणि काही ठिकाणी रेती, वाळू, खडी टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न केला; मात्र पुन्हा त्या खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. पीएमजीपी कॉलनी, गौतमनगर, साठेनगर, बेंगणवाडी आदी परिसरात अशी अवस्‍था आहे. स्थानिकांना या खड्ड्यांचा त्रास सोसावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या.

पीएमजीपी कॉलनीत ९० फुटी रस्त्याचा अपवाद वगळला तर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पोलिस चौकीजवळ नागरिकांना खूप त्रास होतो.
- संजय शेलार, स्थानिक

जीवन तांबे
चेंबूर ते वडाळा मार्गावर उपायोजनांकडे दुर्लक्ष
पूर्व मुक्‍त मार्गावरील पांजरापोळ, जिजामाता नगर, आणिक उद्यान व भक्ती पार्क मोठे खड्डे पडले आहेत. ट्रकला प्रवास करण्यास मनाई असतानासुद्धा चेंबूर येथील पांजरापोळमार्गे वडाळा व शिवडी दिशेने सुसाट धावत असतात. त्यामुळे चेंबूर ते वडाळा मार्गावर खड्डे पडत आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असला असतानादेखील एमएमआरडीए, पालिका वाहतूक विभाग कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही.

जिजामातानगर, भक्तीपार्क , वडाळा, बरकत अली मार्गावर खड्डे पडले आहे. काही भाग खचला आहे. तर सकाळच्या सुमारास बेकायदा जड वाहने प्रवास करीत असल्याने या मार्गावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- अहमद मालीम, कारचालक

मालाड बातमीदार
जनकल्याणनगर रस्त्याची चाळण
मालाड पश्चिमेतील जनकल्याणनगर येथील रस्त्याची चाळण झाली आहे. जनकल्याणनगर रहदारीचा रस्ता असूनही या रस्त्याची दैना झाली आहे. मालवणी क्रमांक एक येथून ते सेंट ज्यूडस शाळेदरम्यान या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली असून येथून बँकेत ये-जा करणारे आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय सुरू आहे.

जनकल्याणनगर रस्त्याची चाळण झाली असून या खड्ड्यांतून वाहनांची चाके जातात, त्यामुळे तो चिखल अंगावर उडून कपडे खराब होतात. हॉर्न सतत वाजतात, त्यामुळे ध्वनी प्रदूषणही प्रचंड होत आहे.
- मनोज परमार, स्थानिक रहिवासी 

धारावी बातमीदार 
खड्ड्यांमध्ये वाहन चालवणे म्हणजे  शिक्षाच 
 धारावीत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य दरवर्षी असते. त्यातूनच आम्हाला चालावे लागते. खड्ड्यांमध्ये वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच असते, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली. खड्ड्यांमधून वाहन घेऊन जावे लागत असल्याने पाठ व कंबरदुखी सुरू झाली आहे. धारावीतील रस्त्यांवरून खड्डे व वाहने चुकवत पादचाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागत आहे. पालिकेने दरवर्षी होणारा त्रास कायमचा संपवावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत. खड्ड्यांमधून गाडी न्यावी लागत असल्याने गाडीचे काही पार्ट खराब होतात. त्यामुळे आर्थिक फटका बसतो. 

 धारावीतील रस्त्यांवरून दुचाकी चालवणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. एक तर खड्डे चुकवत आणि पादचाऱ्यांना चुकवत वाहन चालवावे लागते. तसेच  खड्ड्यांमधून वाहन घेऊन जावे लागत असल्याने पाठ व कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. 
 - संतोष लिंबोरे पाटील, रहिवासी, खांबदेवनगर


प्रशासनाकडून हालचाली
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी दिले. यासंदर्भात मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, वाहतूक पोलिस अधिकारी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, एसआरए, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. आतापर्यंत खड्ड्यांबाबत आठ हजारांहून अधिक तक्रारी दाखल आल्या आहेत. मास्टिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पालिकेने खड्डे भरण्याची मोहीम सुरू केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT