शेतकऱ्यांनो, नुकसानीची आता सवय करा
पाशा पटेल यांचा सल्ला; वृक्षलागवड वाढवावी लागणार
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २३ : शेतकऱ्यांना आता नुकसानीची सवय करावी लागणार आहे. कमी-अधिक पाऊस, थंडी, तापमानवाढ तसेच गारपिटीमुळे वर्षातील सगळेच दिवस शेतकऱ्यांसाठी संकटाचे असणार आहेत. हे सर्व थांबवायचे असेल तर वनक्षेत्र, वृक्षलागवड वाढवावी लागेल, असे मत राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील वृक्षलागवडीच्या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पटेल शुक्रवारी (ता. २२) धाराशिव येथे आले होते. दरम्यान, त्यांनी पीक नुकसानीसंबंधी आपली भूमिका मांडली. देशामध्ये सोयाबीन प्रक्रियेतील सर्वांत मोठा ग्राहक पोल्ट्री व्यवसायातील आहे. देशात जवळपास ९० लाख टन सोयापेंड तयार होत असून, सोयाबीनचे दर तेलावर नाही तर पेंडीवर अवलंबून आहेत. ९० पैकी ६० लाख टन पेंड पोल्ट्रीला, १० लाख टन पशुधनाला जाते आणि २० लाख टन सोयापेंड शिल्लक राहते. ही शिल्लक पेंड आपण निर्यात करू शकलो नाही, तर सोयाबीनचे दर पडलेले असतात. त्यात मागील दोन वर्षांत मक्यापासून इथेनॉल निर्मितीचा निर्णय झालेला आहे. त्यातून २० लाख टन मका पेंड मागील वर्षी शिल्लक राहिलेली आहे. सोयाबीनची २० आणि मक्याची २० अशी ४० लाख टन पेंड शिल्लक असून, बाजारात १४ रुपये किलो मका पेंड, आठ रुपये किलो तांदळाची पेंड आणि ४२ रुपये किलो सोयाबीनची पेंड आहे. त्यामुळे १४ रुपयांना मिळत असताना ४२ रुपयांची पेंड कोणी घेणार नाही. त्यामुळे जोपर्यंत सोयाबीन पेंड निर्यातीसाठी सरकार अनुदान देणार नाही तोपर्यंत सोयाबीनचे दर वाढणे शक्य नाही, असे स्पष्ट मत पटेल यांनी व्यक्त केले.
...........
इथेनॉलसह पर्यायांपासून इंधननिर्मिती
धाराशिव आणि मराठवाडाच नव्हे तर जगातील सहा खंडांना ढगफुटी, महापूर, वणवा, तापमानवाढीने घेरले आहे. हवेत कार्बनचे प्रमाण ३५० पीपीएम पाहिजे ते ४३० पीपीएम झालेले आहे. ते ४५० झाले की पृथ्वीवर माणसाचे राहणे अवघड होणार आहे. ढगफुटी, वणव्यांचे प्रमाण वाढेल, असे जागितक संस्थांचे म्हणणे आहे. वातावरण बदलाचे हे परिणाम आहेत. हे थांबवायचे असेल तर ऊर्जा जमिनीच्या पोटातून काढण्याऐवजी ती जमिनीवरून म्हणजे ऊस आणि इतर घटकांपासून इथेनॉल, इतर पर्यायांपासून इंधननिर्मिती करावी लागेल, असे पटेल यांनी सांगितले.
कोट
---
पावसामुळे जे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई कोणी करू शकेल काय? शेतकऱ्यांचे जितके नुकसान झालेले आहे त्याची भरपाई करण्याची क्षमता कोणाचीही असू शकत नाही. आपण सरकारच्या मदतीने नुकसानभरपाई नाही तर मदत करू शकतो. नुकसान भरून काढणे शक्यच नाही.
- पाशा पटेल,
अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.