गणरायाच्या स्वागतासाठी सज्जता
नवी मुंबईतील बाजार सजले, खरेदीसाठी झुंबड
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : गणेशोत्सवाला काही दिवसांचा अवधी असल्याने नवी मुंबईतील बाजारपेठा खरेदीदारांनी गजबजल्या आहेत. अशातच दोन दिवस साप्ताहिक सुट्टी आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये उसळलेल्या अलोट गर्दीने उत्साह संचारला आहे.
आशिया खंडातील बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी एपीएमसी बाजारपेठेसह वाशीतील सेक्टर-९ मधील बाजारपेठ दिवसभर खरेदीदारांच्या गर्दीने फुलून निघाली आहे. नवी मुंबईतील गणेशोत्सवाच्या तयारीसाठी वाशीच्या सेक्टर-९, तुर्भे जनता मार्केटमध्ये गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी करत आहेत. मखर, दिवे, रोषणाई, कृत्रिम फुले, इतर सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यंदा पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंना सर्वाधिक मागणी आहे.
---------------------------------------------
वैविध्य आकर्षणाचे केंद्र
मखर, रोषणाई यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आता गणराय घरोघरी विराजमान होणार आहेत. पूजा साहित्य खरेदी करण्याची लगबग बाजारात सुरू आहे. उदबत्त्यांचा सुगंध, रंगीत वाती, पाट, चौरंग आणि दिव्यांची आरास, हरितालिका मूर्ती साहित्याने बाजार सुगंधित झाला आहे. पूजा साहित्याचा भाव तुलनेने वाढला असला त्यातील वैविध्य भाविकांना आकर्षित करत आहे.
-------------------------------------
पूजा सामग्रीला महागाईची झळ
महागाईची झळ पूजा सामग्रीलाही बसल्याचे दिसून येत आहे. यंदा पूजा साहित्याच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. तसेच गोल्ड प्लेटेड दिवे, रंगीत माळा, गणपती-गौरींचे मुकुट, आरतीचे तबक अशा डिझायनर वस्तूंच्या किमतीत ४५ ते ५० टक्के वाढ झाली आहे. महागाई असली तरी साहित्य खरेदी करण्याकडेच भाविकांचा कल आहे.
-----------------------------------------
हरितालिकेसाठी महिलांची तयारी
गणरायांच्या आगमानापूर्वी हरितालिका व्रत केले जाते. त्यासाठी हरितालिकेच्या मूर्ती, ओटीचे साहित्य, पान, विडा, सुपाऱ्या, गजरे यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. सुमारे ३० ते ४० रुपयांपर्यंत या मूर्ती मिळतात. यांसह देवीच्या लहान वेण्या, मूर्तींच्या आकाराचे लहान हार यांनीही महिलांना आकर्षित केले आहे. ओटीचे साहित्य एकाच पाकिटात मिळत असल्याने ते सोईचे ठरते.
-----------------------------------------
गणरायांच्या प्रतिष्ठापना पूजेसाठी आवश्यक असणारे बदाम, खारीक, मध, अष्टगंध, धूप, वाती, हळकुंड, अत्तर अशा अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. उदबत्त्यांचे तब्बल ३० ते ३५ प्रकार उपलब्ध आहेत. मोगरा, जाई, जुई, गुलाब, केशर अशा सुवासिक उदबत्त्यांना मोठी पसंती मिळत आहे.
---------------------------------------
वाहतूक कोंडी
एपीएमसी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
---------------------------------------
पावसामुळे खरेदीसाठी विलंब झाला. पावसाने उसंत घेतल्याने खरेदीसाठी बाहेर पडावे लागले. बाजारात कोंडीचा सामना करावा लागतो.
- नंदिता पाटील, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.