कलेचा अधिपती विराजमान
गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) : लाडक्या गणरायाच्या आगमनाने वातावरणात हर्षोल्लास संचारला आहे. घरोघरी ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आगमन सोहळा सुरू झाला असून, कलेचा अधिपती विराजमान झाल्याने सर्वत्र उत्साह संचारला आहे.
गणेशोत्सव जवळ आला की मुंबई आणि इतर शहरांमधील कोकणवासीयांना गावाकडे ओढ लागते. कुटुंबातील प्रत्येकजण, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आपापल्या मूळ गावी परततात. एसटी बस आणि कोकण रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होते. या प्रवासातूनच उत्सवाचा उत्साह सुरू होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीतून सामाजिक बांधिलकी जपण्यावर भर दिला जात आहे. मंगळवारी दुपारपासूनच गणराय घराघरात विराजमान होत आहेत. या वेळी गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणण्याची पद्धतही खास आहे. अनेक ठिकाणी डोक्यावर मूर्ती घेऊन ढोल-ताशांच्या गजरात नाचत गाजत बाप्पाला घरी आणले जाते. घरातील स्त्रिया पायावर पाणी घालून बाप्पाचे स्वागत करतात.
----------------------------------------------
सामाजिक उपक्रमांवर भर
कोकणातील घरांची सजावट साधी पण मनमोहक असते. घरातील भिंतींना लाल मातीचा मुलामा दिला जातो आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून मखर सजवले जाते. रानफुले, वेली, नारळ, सुपारी आणि इतर स्थानिक वस्तूंच्या मदतीने एक सुंदर आणि पारंपरिक आरास तयार होते. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून नशामुक्तीसह बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छतेविषयी चलचित्रातून सामाजिक उपक्रम राबविले जातात.
-----------------------------------
लोककलांची रेलचेल
उत्सवाच्या १० दिवसांत सकाळ-संध्याकाळ आरती, भजनांचा आवाज गावोगावी घुमतो. प्रत्येक वाडीत भजनी मंडळ असते. भजन, गवळण, भारुड आणि शेवटचा गजर अशा पारंपरिक पद्धतीने भजन म्हटले जाते. सर्व गावकरी उत्साहाने सहभागी होतात.
------------------------------------
पारंपरिक नृत्य, खाद्यपदार्थ
गणेशोत्सवादरम्यान कोकणातील जाखडी नृत्य आणि फुगडी यांचा विशेष कार्यक्रम केला जातो. या नृत्यांमध्ये सर्व वयोगटातील लोक आनंदाने भाग घेतात. मोदकांबरोबर पंचखाद्य (काजू, सुके खोबरे, चणाडाळ, शेंगदाणे आणि लाह्या) हा कोकणातील खास प्रसाद असतो. कोकणातील गणेशोत्सव हा फक्त धार्मिक विधी नाही, तर तो कौटुंबिक स्नेहमेळा, परंपरा जपण्याचा एक सुंदर सोहळा आहे.
-------------------------------------
जिल्हाभर उत्साहाचे वातावरण
दीड दिवस - २५ हजार ५५१
पाच दिवस - एक हजार ३२२,
सात दिवस- ५६ हजार ४६८
अनंत चतुर्थी - १८ हजार २११
एकूण - १ लाख २ हजार ४८४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.