जव्हार, ता. १ (बातमीदार) : डोंगर-दऱ्यांनी व्यापलेल्या जव्हार तालुक्यात पावसाळ्यात निसर्गतः उगवणाऱ्या रानभाज्या चविष्ट व पौष्टिक असल्याने ग्रामीण भागात यांना मोठे महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर वयमअंतर्गत रायतळे ग्रामपंचायत हद्दीतील धोपट पाडा येथे रविवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजता रानभाजी महोत्सव भरवण्यात आला होता. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांनी रानभाज्यांचे सेवन करून आरोग्य सुधारावे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, असा होता. महोत्सवात बचत गटातील महिलांनी गावठी पाककृतींद्वारे उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या महोत्सवात खुरसणीचा पाला, कोहरूळ, कुरडू, शिंद आदी रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले. प्रत्येक स्टॉलवर त्या भाज्यांचे पौष्टिक गुणधर्म, औषधी फायदे आणि पाककृतीची माहिती देण्यात आली. रानभाज्यांचा नियमित आहारात समावेश केल्याने आरोग्य सुधारते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. या भाज्यांच्या पाककृती बाजारात उपलब्ध करून महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. रानभाज्यांचे संवर्धन व प्रचार हा आरोग्यदायी समाजासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे, असे आयोजकांनी सांगितले.
पारंपरिक खाद्यसंस्कृती व महिलांचे सक्षमीकरण
वयम चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर, भरत पाटारा आणि महेंद्र पाटारा यांनी मार्गदर्शन करताना रानभाजी महोत्सव हा उपक्रम पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासाठी, आरोग्यपूर्ण आहारासाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांची शहरी भागातही आवश्यकता असून त्यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक व औषधी भाज्यांची ओळख शहरी लोकांनाही होईल, असे त्यांनी नमूद केले.
रोजगाराच्या नव्या संधी
स्थानिकांच्या मते, अशा उपक्रमांमुळे रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. रानभाज्यांचे संवर्धन व प्रचार हा आरोग्यदायी समाजासाठी आवश्यक असून त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.