निर्माल्य प्रकल्पातून दरमहा तीन टन खतनिर्मिती
श्री गणेश मंदिर संस्थानकडे दररोज सुमारे हजार किलो निर्माल्य जमा
डोंबिवली, ता. १५ : गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानकडून मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. संस्थानच्या विविध निर्माल्य संकलन केंद्रांवरून दररोज सुमारे ८०० ते ११०० किलो निर्माल्य जमा होत असून, महिन्याला सुमारे ३० टन निर्माल्य जमा होते. या निर्माल्यापासून दर महिन्याला सुमारे तीन टन जैविक खत तयार केले जाते, असे प्रकल्प समन्वयक विजय घोडेकर यांनी सांगितले.
गणेशोत्सवादरम्यान खाडीकिनारी, विसर्जन घाट आणि कृत्रिम तलाव परिसरात पालिकेने ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवून निर्माल्य संकलनासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यामुळे नागरिकांनीही निर्माल्य कोठेही टाकण्याऐवजी संकलन केंद्रांवर जमा केले, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. संकलित झालेल्या निर्माल्यातील दोरे, प्लॅस्टिक, कागद यांची वेगळी छाटणी केली जाते. नंतर फुलांचा वाफा तयार करून त्यावर जैविक फवारणी केली जाते. सुमारे ३५ दिवसांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खताला जाळी लावून गाळणी केली जाते आणि खताच्या जाडे-भरड व बारीक रवळ अशा दोन प्रकारात वेगळे केले जाते. खत प्रक्रियेत शहाळ्यासारख्या टणक वस्तूंचादेखील वापर केला जातो.
श्री गणेश मंदिर संस्थान आणि नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत तयार झालेले जैविक खत शेतकरी तसेच शहरातील बागकाम करणाऱ्या नागरिकांना विकले जाते. या उपक्रमामुळे डोंबिवली परिसरातील तलाव, विहीर, खाडी व सार्वजनिक जागांवर निर्माल्य टाकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. विजय घोडेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, निर्माल्य प्लॅस्टिक पिशवीत न टाकता कागदी किंवा कापडी पिशवीत जमा करावे, जेणेकरून त्याचे विघटन योग्यरित्या होऊन खतनिर्मिती प्रक्रियेला चालना मिळेल.
सणासुदीच्या काळात सार्वजनिक मंडळ, मंदिर प्रशासन तसेच नागरिक प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माल्य आणून देत असतात. त्यावर जैविक पद्धतीने प्रक्रिया करून जैविक खत तयार केले जाते. श्री गणेश मंदिर संस्थान गेली २० वर्षे हा उपक्रम राबवित आहे. त्यामुळे तलाव, विहीर, खाडी तसेच उघड्यावर निर्माल्य टाकण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. ही कौतुकास्पद बाब असून, एक खंत घोडेकर यांनी व्यक्त केली. नागरिक प्लॅस्टिकच्या पिशवीत निर्माल्य जमा करून ते केंद्रावर जमा करतात, मात्र कागदी किंवा कापडी पिशवीत निर्माल्य जमा करावे. जेणेकरून त्याचे विघटन योग्यरित्या होऊन खतनिर्मिती चांगली होते, असे आवाहन त्यांनी या वेळी नागरिकांना केले आहे.
३५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण
प्रकल्पात तयार झालेले खत शेतकरी, शहरातील बागकामाची आवड असलेले रहिवासी झाड, बाग लागवडीसाठी खरेदी करतात. निर्माल्य केंद्रात दाखल झाल्यानंतर त्यातील दोरे, चकाकी कागद, प्लॅस्टिक वेगळे केले जाते. फुलांचा वाफा तयार करून त्यावर विरजण फवारणीची प्रक्रिया केली जाते. ३५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाली की खताला जाळी लावून गाळून घेतले जाते. त्यामधील जाडेभऱडे खत आणि बारीक रवळ खत गाळणीतून वेगळे केले जाते. शहाळ्यासारख्या टणक वस्तू कचऱ्यातून आणल्या जातात. त्या येथे कुजवून त्याचे पीठ केले जाते. खत प्रक्रियेत याचाही वापर केला जातो. महिन्याला साधारण ३० टन निर्माल्य जमा होत असून, त्यापासून दरमहा तीन टन खताची निर्मिती केली जाते. डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील गणेश मंदिर संस्थान येथून या खताची विक्री केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.