वाशी येथे पुनर्विकास परिषदेला प्रतिसाद
सहकार भारती, विकास इंडिया ट्रस्ट व नवी मुंबई हाउसिंग फेडरेशनचा उपक्रम
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) ः नवी मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रातील पुनर्विकासाच्या आव्हानांवर आणि संधींवर मार्गदर्शन करण्यासाठी वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात पुनर्विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या आयोजनात सहकार भारती, विकास इंडिया ट्रस्ट आणि नवी मुंबई हाउसिंग फेडरेशन या संस्थांचा मोलाचा सहभाग होता.
या परिषदेचे उद्घाटन बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमात सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांचा नाबार्ड संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच धनंजय यादव यांची काजू मंडळाच्या स्वतंत्र संचालकपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. परिषदेत महाराष्ट्र शासन फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, प्रसाद परब, भास्कर म्हात्रे आणि अश्विनी बुलाख यांसारख्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विकास पाटील यांनी नवी मुंबईला भेडसावणाऱ्या गृहनिर्माणाशी संबंधित ज्वलंत समस्यांचा ऊहापोह केला. पुनर्विकास धोरणे आखताना या समस्यांचे निराकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सतीश मराठे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना गृहनिर्माण क्षेत्रातील प्रमुख समस्या म्हणजे अर्थपुरवठा असल्याचे नमूद केले. यासंदर्भात शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. नवी मुंबई सहकार भारतीचे अध्यक्ष प्रमोद जोशी यांनी संस्थेने उचललेल्या विविध आंदोलनांची आणि प्रश्नांची माहिती दिली. महामंत्री संतोष मिसाळ यांनी नवी मुंबईत ‘सहकार भवन’ उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
...............
चौकट
आमदार मंदा म्हात्रे यांनी पुनर्विकास प्रक्रियेत वाढीव एफएसआय मिळवून दिल्याबद्दलची कामगिरी अधोरेखित केली. त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्यांनी आपले घर विकसकांना देताना काळजीपूर्वक प्रक्रिया राबवावी, दबाव वा प्रलोभनांना बळी पडू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. आपल्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. या परिषदेच्या माध्यमातून गृहनिर्माण क्षेत्रातील प्रश्न, पुनर्विकासाची गरज आणि सुरक्षित धोरणात्मक पावले याबाबत जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.