मार्जिनल स्पेसवर पोटभाडेकरूंचे अतिक्रमण
पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; नागरिक त्रस्त, सुरक्षेचे प्रश्नही निर्माण
वाशी, ता. १५ (बातमीदार) ः वेगाने विकसित होत असलेल्या शहरात अतिक्रमणचा मुद्दा पुन्हा डोके वर काढत आहे. बेलापूरपासून दिघ्यापर्यंत पसरलेल्या आठही विभाग कार्यालयांच्या हद्दीत मार्जिनल स्पेस म्हणजेच दुकानाबाहेरील मोकळी जागा व्यापाऱ्यांनी बेकायदा ताब्यात घेतली आहे. या जागा स्वतःच्या व्यवसायासाठी तर वापरल्या जात आहेतच, पण त्याहून चिंताजनक बाब म्हणजे काही व्यापारी त्या जागा पोटभाडेकरूंना मोठ्या रकमेत देऊन कमाई करत आहेत.
नियोजित शहर म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते, मात्र मागील काही वर्षांपासून शहरात बेकायदा अतिक्रमण वाढले आहे. अनेक दुकानदार समोरील जागेचा अनधिकृतरित्या वापर करू लागला आहे.
सुरुवातीला माल थोडा बाहेर ठेवण्यापुरते मर्यादित असलेले अतिक्रमण आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी पत्रे लावून वेगळे शेड्स तयार करण्यात आले असून, ती पोटभाडेकरूंना दरमहा आठ ते १२ हजार रुपयांत दिली जात आहे. वाशी, नेरूळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली, सानपाडा, सीवूड्स या सर्वच भागांत हीच स्थिती असून, रेल्वेस्थानकांच्या बाहेरील मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे पदपथ अडवले जात असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे भाग पडत आहे. परिणामी वाहतुकीचा गोंधळ आणि अपघाताचा धोका वाढू लागला आहे. एवढेच नव्हे तर खाद्यपदार्थ विकणारे गाडे आणि टपऱ्यांमध्ये गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही वर्षांपूर्वी ऐरोलीत अशाच प्रकारच्या गैरवापरामुळे घराला आग लागून दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
..............
प्रशासनाची कारवाई थंडावली
माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात अशा अतिक्रमणांवर धडाकेबाज कारवाई करून पदपथ मोकळे करण्यात आले होते, मात्र कोरोनानंतर ही कारवाई थंडावली असून, पुन्हा एकदा व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू केली आहे. सुरुवातीला विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनी मोहीम राबवली होती, पण सध्या ती पूर्णपणे थंडावली आहे. परिणामी व्यापाऱ्यांचा व पोटभाडेकरूंचा सुळसुळाट वाढत चालला आहे.
..................
प्रशासनाचा इशारा
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी स्पष्ट केले की, शहरातील सामासिक जागेचा गैरवापर करणे सहन केले जाणार नाही. पादचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा पोटभाडेकरूंवर व त्यांना जागा देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.