चित्ता कॅम्प परिसरात घाणीचे साम्राज्य
डेंगी, मलेरिया आजारांची लागण
मुंबई, ता. १७ ः मानखुर्द चित्ता कॅम्प परिसरात पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ व दुर्गंधी पसरलेली आहे. परिणामी डेंगी, मलेरियासारखे साथीचे आजार पसरत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
चेंबूर, गोवंडी व मानखुर्दमधील चित्ता कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी विभाग आहे. या परिसरात कष्टकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात राहात आहे. चित्ता कॅम्प परिसरातील जॉन्सन जेकब मार्ग, व्हीएन पूरव मार्ग, मिर्झा गालिब मार्ग, ईस्टर स्कूल, वॉर्ड क्रमांक १४३, १४५ मुस्लिम कब्रस्तान, एमजीआर मार्ग व परिसरात पावसाचे पाणी साचत आहे.
साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे कित्येक रहिवाशांच्या घरात पाणी शिरते. पाऊस कमी झाल्यानंतर गाळ आणि कचरा मागे राहिला आहे. त्यामुळे लोक घसरून पडत आहेत.
साथीच्या आजारांचा धोका
चित्ता कॅम्प परिसरात पालिकेतर्फे साफसफाई केली जाते, मात्र ती योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरलेली आहे. यावर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाल्याने डेंगी, मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया यासारखे साथीचे आजार व लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढत आहे. पालिका एम पूर्व विभाग डास नियंत्रण मोहीम राबवत असले तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम फारसा जाणवत नाही. अनेक भागांत दैनंदिन कीटकनाशक धूर फवारणी केली जात नाही, पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांच्या उत्पत्ती होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पालिकेची ड्रेनेज सिस्टम पूर्णपणे कार्यरत नाही. त्यामुळे परिसरात पाणी साचत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
पालिका संबंधित अधिकारी तपासणीसाठी येतात, मात्र परिसरातील फक्त नाले उघडून पाहतात आणि फोटो काढून निघून जातात, मात्र कायमस्वरूपी ड्रेनेज व्यवस्था नाही.
- आसिफ सय्यद, सामाजिक कार्यकर्ते
पालिकेने गाळ व पाण्याचा निचरा करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू.
- हाफिज शेख, सामाजिक कार्यकर्ते