भारताला महासत्ता करण्याचा २०४७ सालचा रोडमॅप तयार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला महासत्ता बनविण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. २०४७ साली भारत विकसित देश होईल. भारताला महासत्ता करण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा, राज्य विकसित झाले पाहिजे. त्यासाठी २०४७ चा रोडमॅप आम्ही तयार केला असल्याचे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण तालुक्यातील खोणी गावात पार पडलेल्या कार्यक्रमात बुधवारी (ता. १७) केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय आरंभ खोणी गावात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते बुधवारी पार पडला. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, सुलभा गायकवाड, ज्ञानेश्वर म्हात्रे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लाभार्थींना धनादेश आणि लोकोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की २०१४ पूर्वीचा भारत आणि २०१४ नंतरचा भारत हा पूर्णपणे बदलला आहे. त्याने जागतिक पातळीवर प्रगती केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे २०४७ साली भारत महासत्ता हाेणार यात काही शंका नाही. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत राज्यातील एक हजार नऊ गावे आणि ४३१ ग्रामंपयातींना २५० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. साडेतीन महिन्यांत हे अभियान चालविले जाणार आहे. प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटींचे बक्षीस मिळणार आहे. ठाणे जिल्हा हा या अभियानात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी सगळ्यांनी चांगले काम करा, असे आवाहनही शिंदे यांनी या वेळी केले.
मी गावी गेल्यावर विरोधक डिप्रेस होतात!
मी गावी गेलो की लगेच विरोधक ‘मी गावी का जातो?’ असा प्रश्न उपस्थित करतात. माध्यमंही लगेच विचारतात. मी गावी शेती करण्यासाठी जातो. गावी गेल्यावर मला फ्रेश वाटते. मी फ्रेश होतो आणि माझे विरोधक डिप्रेस होतात, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना हसत हसत लगावला.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असताना राज्याच्या जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्याचा लाभ सामान्य जनतेला मिळतो. त्यात महिला, शेतकरी, तरुण आदींचा समावेश आहे. राज्याची प्रगती कशी हाेईल यावर भर दिला आहे. लाडकी बहीण योजना सुरू केली. कोणी कितीही काही टीका केली, बोलले तरी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.