आजपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात
डोंबिवलीत दांडिया किंग नैतिक नागदा रसिकांना ताल धरायला लावणार
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर रासरंग २०२५ च्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ७.३० ते रात्री १० पर्यंत दांडिया आणि गरबा रास रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी जगविख्यात दांडिया किंग नैतिक नागदा आणि त्यांचा वाद्यवृंद कलाकारांचा समूह उपस्थित राहणार असून, ते सलग १० दिवस रसिकांना ताल धरायला भाग पाडणार आहेत.
सोमवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता घटस्थापनेसोबतच भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळ्या पद्धतीने ढोल-ताशा व झांज पथकाच्या गजरात व २१०० विविधरंगी फुगे आसमंतात सोडून या उत्सवाची सुरुवात होणार आहे. हा उत्सव २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या १० दिवस चालणार असून, २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. दररोज सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता देवीची आरती होणार आहे.
या नवरात्रोत्सवात मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार, प्रख्यात गायक, सिनेनाट्य कलाकार, वाद्यवृंद तज्ज्ञ, कवी-साहित्यिक, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध क्षेत्रातील खेळाडू, वारकरी संप्रदाय, ब्रह्माकुमारी, सनातन, गायत्री परिवाराचे सदस्य, स्थानिक नागरिक आणि लाडक्या बहिणी मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, महाराष्ट्र शासनातील माननीय मंत्रिमंडळातील सदस्य, पोलिस व प्रशासनातील अधिकारी, आरोग्य यंत्रणेतील मान्यवर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. व्यापारी संघटना, रिक्षा युनियन, वैद्यकीय संघटना, ज्वेलर्स संघ यांचे प्रतिनिधीदेखील देवीच्या आरतीसाठी हजेरी लावणार आहेत. कल्याण शहरातील हा १० दिवसीय नवरात्रोत्सव धार्मिकतेसोबतच सामाजिक व सांस्कृतिक जत्रेचे रूप धारण करणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नवदुर्गा पुरस्काराने गौरविणार
महिलांसाठी विशेष कार्यक्रम म्हणून नवदुर्गा पुरस्कार देण्यात येणार असून, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, उद्योग व इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना या सोहळ्यात गौरविण्यात येईल.
भोंडल्याचा कार्यक्रम
रविवार (ता. २८) दुपारी ३ वाजता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्रीच्या उपस्थितीत महिलांसाठी भोंडल्याचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार (ता. ३०) दुपारी ४ वाजता कुमारीपूजन आणि कुंकुमार्चन आयोजित करण्यात आले आहे.