उल्हासनगर, ता. ६ (बातमीदार) : मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनगरातील रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. पालिकेचे प्रयत्न रस्ते भरण्यास अपुरे पडल्यामुळे अनेक वाहनांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या परिस्थितीतच एका कुल्फीवाल्याची हातगाडी पलटल्याने त्याची उपजीविका बाधित झाल्या घटना नुकतीच घडली आहे.
कॅम्प नंबर ५ मधील मठ मंदिर ते दसरा मैदान हा रस्ता खड्ड्यांनी भरून गेला आहे. जेवणानंतर नागरिक थंड पेय किंवा कुल्फी घेण्यासाठी घराबाहेर येतात. याचा फायदा घेऊन शहरात अनेक हातगाड्यांवर कुल्फी विक्रीचा व्यवसाय चालतो. शनिवारी रात्री, कुल्फी तयार करून विक्रीसाठी जात असताना, एक हातगाडीवाला दसरा मैदान ते मठ मंदिर मार्गाने जात होता. मात्र चाक खड्ड्यात अडकल्याने संतुलन बिघडले. यात हजारो रुपयांचा माल रस्त्यावर पडला. शेजारच्या व्यापाऱ्यांनी मदत करून कुल्फी उचलण्याचा प्रयत्न केला; पण रस्त्यावरील घाण आणि खड्ड्यांमुळे हातगाडीवाल्याचे नुकसान झाले. दरम्यान, आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अलीकडेच शहर दौऱ्यात खड्ड्यांची पाहणी करून तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनीही संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. मात्र अद्यापही रस्त्यांची दुरुस्ती अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यामुळे नागरिक मुहूर्त कधी लागणार, असा सवाल उपस्थित करत आहेत.