बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : बदलापूर पूर्वेकडील पॅराडाईज पार्क सोसायटीबाहेरील रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचे काम अर्धवट राहिल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही आणि अनेक गाड्या अडकल्याचे प्रकार समोर आले आहेत. ठेकेदाराच्या कामाचा दर्जा पालिका तपासते की नाही, असा प्रश्न गंभीर असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
बदलापूर पूर्वेकडील कात्रप गणेश घाट परिसरातील पॅराडाईज पार्क सोसायटीबाहेरील अंतर्गत रस्ता मुख्य रस्त्याशी जोडला जातो. या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम ठेकेदाराकडून दोन महिन्यांपासून अर्धवटच राहिले आहे. अर्ध्या बाजूचे काम पूर्ण झाले असताना, दुसऱ्या बाजूला पेव्हर ब्लॉकचा पट्टा बसवलेला आहे. सिमेंट काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या अर्ध्या भागात मोठी पोकळी निर्माण झाली असून, तयार झालेला खड्डा अपघातांना आमंत्रण देत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे मागच्या महिन्यात दोन चारचाकी वाहनांचे चाक अडकले, ज्यामुळे चालकांचे मोठे नुकसान झाले. पालिकेने दिलेल्या कामाची चौकशी किंवा निरीक्षण करणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित ठेकेदाराने संपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि त्यानंतरच त्याला कामाची बिले अदा करावी; जेणेकरून रस्त्यावरील अपघाताचा धोका कमी करता येईल, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
बदलापूर : अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत.