...तर व्हिडिओ आताच व्हायरल करा!
वनमंत्री गणेश नाईक यांचे नरेश म्हस्के यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ‘माझ्या गरजांइतके पैसे माझ्याकडे आहेत. मी अशी कोणतीही कामे करीत नाही, ज्यामुळे आयकर किंवा सीबीआयचा छापा पडेल. त्यामुळे माझा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर आताच करा, असे थेट आवाहन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. दोन दिवसांपूर्वी शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नाईक यांच्या ‘नालायकपणाचे व्हिडिओ’ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटागृहांत प्रदर्शित करू, असा इशारा दिला होता. त्यावर गणेश नाईक यांनीदेखील हे आवाहन दिले.
राम गणेश गडकरी रंगायतन येथे सोमवारी (ता. ६) आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नाईकांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आजही मी शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. माझ्या आयुष्यात जर मी चुका केल्या असतील तर त्याचे पाप मी माझ्या खांद्यावर घेऊन जाईन. मी ९० साली आमदार झालो. आता २०२५ सुरू आहे. गेल्या ३५ वर्षांत असे किती लोक आले आणि गेले, त्यांची नावेही आठवत नसल्याचा टोला नाईक यांनी म्हस्केंना लगावला. पुढे ते म्हणाले की माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी दोष देत नाही. जो आपले कर्तव्य पार पाडत नाही तो नालायकच आहे. मी काम करीत नसेन तर मीसुद्धा नालायकच ठरू शकतो. मानवाने निर्माण केलेली संकटेच आज जनता दरबारात येत आहेत. प्रशासनात १० टक्के लोक नालायक आहेत, याची प्रचीती नुकतीच आली, जेव्हा काही अधिकारी पैसे घेताना पकडले गेले, जे नालायक आहेत आणि शक्तीचा दुरुपयोग करून गरिबांच्या आयुष्याचा सत्यानाश करतात, त्यांना थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे मतदेखील नाईक यांनी या वेळी व्यक्त केले. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या विषयावर नाईक म्हणाले, की मला पूर्ण विश्वास आहे की या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल. यासंदर्भात दोन दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे.
...तर जनता दरबार बंद करेल!
मला जनता दरबार भरविण्याची काही हौस नाही, पण लोकांना दिलासा देणारे काम या दरबारातून होत आहे. लोकांच्या तक्रारी येथे येतात. त्यामुळे अधिकारी कामे जलदगतीने काम करीत आहेत. जर येथे कोणी येणारच नसेल तर असा दरबार बंद करायला मला अजिबात वेळ लागणार नाही, असेही वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.