कळवा-मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरण (किकर)
सुरक्षित प्रवासासाठी ‘एआय’ प्रणालीची शिफारस
चाैकशी समितीचा अहवाल; ‘सुरक्षा शुल्क’बाबत प्रवाशांची सूचना
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : कळवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाले होते. या घटनेच्या चाैकशीसाठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने रेल्वेला अहवाल सादर केला आहे. या अहवालात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वापरून ‘रिअल टाइम’ जोखीम ओळखणाऱ्या प्रणालीसह अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या आहेत. प्रवाशांनी सुरक्षा शुल्क आकारण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली असून, त्यावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
अहवालात या घटनेच्या कारणांसह प्रवासी सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण शिफारशी चौकशी समितीने सुचवल्या आहेत. एआय तंत्रज्ञान वापरून ‘रिअल टाइम’ जोखीम ओळखणारी प्रणाली उभारण्याची शिफारस केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकलच्या दरवाजाजवळील प्रवाशांच्या धोकादायक हालचाली, लोंबकळणारे प्रवासी किंवा गर्दीचा भार याबाबत तत्काळ सूचना मिळू शकणार आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षाला तत्काळ अलर्ट जाऊन गाडी थांबवणे, सुरक्षा पथकाला पाठवणे किंवा उद्घाेषणा करून प्रवाशांना धोक्याचा इशारा देणे शक्य हाेईल, असे समितीचे म्हणणे आहे. याशिवाय मोबाइल अॅप आणि स्थानकांवरील डिजिटल डिस्प्लेवर प्रत्येक डब्यातील गर्दीची ‘रिअल टाइम’ माहिती दाखवण्याची शिफारसही अहवालात केली आहे. त्यामुळे कमी गर्दी असलेल्या डब्यांची सूचना मिळून प्रवाशांना त्या डब्यांतून प्रवास करता येईल. त्यामुळे दरवाजावरचा ताण आपाेआप कमी होण्यास मदत हाेईल.
स्वयंचलित दरवाजे अन् सुधारित कोच
अहवालात सर्व उपनगरी गाड्यांमध्ये सेन्सरवरआधारित स्वयंचलित दरवाजे बसवण्याची शिफारस केली आहे. लोकल सुरू झाल्यानंतर दरवाजे आपोआप बंद होतील. त्यामुळे प्रवासी बाहेर लोंबकळू शकणार नाहीत. कोचच्या प्रवेशद्वारांची रचना बदलून ती अधिक सुरक्षित करणे, गर्दीच्या वेळेत गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे आणि पर्यायी वाहतूक साधने मेट्रो, बस, वॉटर वेज, एअर टॅक्सी, रोप-वे यांचा विकास करणे या दीर्घकालीन उपाययोजना या अहवालात सुचवण्यात आल्या आहेत.
------
अपघाताचे कारण
चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार, एका प्रवाशाची बॅग या अपघातासाठी कारणीभूत ठरली आहे. धावत्या लोकलमधून बाहेर लोंबकळत प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग समोरून येणाऱ्या गाडीला लागली. त्यामुळे काही प्रवासी खाली पडले. या घटनेत जखमी झालेल्या १३ प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी पाच जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
---
तातडीच्या शिफारशी
- अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक लावणे
- घोषणा प्रणालीद्वारे सावधगिरीचा सल्ला
- फूटबोर्डवरून प्रवासाविरोधात जनजागृती मोहीम राबवणे
- ‘रिस्क झोन’ भागावर विशेष लक्ष ठेवणे
- स्थानकातील कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदारी देणे
---
तिकिटावर दाेन-तीन रुपयांचा अधिभार?
प्रवाशांनीही काही सूचना समितीसमोर मांडल्या आहेत. भाडे परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी एसी लोकलचा प्रवास टाळतात. त्यामुळे विद्यमान गाड्यांमध्ये तांत्रिक सुधारणा करून तिकिटावर दोन ते तीन रुपये ‘सुरक्षा शुल्क’ आकारावे आणि हा निधी प्रवासी सुरक्षेसाठी वापरावा, अशी महत्त्वाची सूचना प्रवाशांनी केली आहे. खिडक्या मोठ्या ठेवाव्यात, गर्दी व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीची शिफारस त्यांनी केली आहे.
.....
रेल्वेचे म्हणणे
अहवालातील सर्व शिफारशी गांभीर्याने घेतल्या जात आहेत. विशेषतः एआयआधारित निरीक्षण प्रणाली आणि स्वयंचलित दरवाजांची अंमलबजावणी ही उपनगरी रेल्वे सुरक्षेतील महत्त्वाची झेप ठरेल. प्रवासी सुरक्षेसाठी नवकल्पनांचा वापर करणे हा पुढील टप्पा असेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.