मुंबई महापालिका प्रभागरचनेवर शिक्कामाेर्तब
निवडणूक आयाेगाची अधिसूचना; राजकीय पक्षांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई महापालिकेच्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर हरकती आणि सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीतील २२७ प्रभाग कायम ठेवले आहेत. प्रभागांत फारसे बदल करण्यात आले नसल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. प्रभागरचनेस मंजुरी दिल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार असून, आता प्रभागांच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारूप आराखडा ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केला होता. या आराखड्यावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी नागरिकांना ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. प्रभागरचनेच्या प्रारूपावर ४९४ सूचना आणि हरकतींवर १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर अशी तीन दिवस सुनावणी झाली. राज्य सरकारने आणि राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेच्या प्रारूपाला अंतिम स्वरूप दिले आहे.
---------------
२०१७चे प्रभाग कायम
मुंबईत २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीतील २२७ प्रभाग कायम ठेवले आहेत. प्रभागांत फारसे बदल करण्यात आले नसल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
--------
प्रभागांचा समतोल साधला
काही प्रभागांत लोकसंख्या वाढली आहे. त्यानुसार प्रभागरचना करताना ते समतोल राहतील, याचा विचार केल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भौगोलिक सीमा, द्रुतगती मार्ग, नाले, उड्डाणपूल, अंतर्गत रस्ते यांचाही प्रभागरचना करताना विचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो रेल्वे या सर्व गोष्टींचा या प्रभागरचनेत अंतर्भाव करण्यात आला आहे.
-----------------
आता लक्ष आरक्षणाकडे
प्रभाग फेररचना झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांना प्रभागांच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत. आपला प्रभाग महिलांसाठी आरक्षित होणार की खुला होणार, याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष लागले आहे.
-------
अंधेरीतील प्रभाग क्रमांक ७१च्या प्रभागरचनेबाबत हरकत घेण्यात आली होती. अंधेरी रेल्वेस्थानक ते विलेपार्ले अशी या प्रभागाची फेररचना केली आहे. गोखले पुलाची हद्दही त्यांनी गृहीत धरलेली नाही. भाजपच्या फायद्यासाठी हे केल्याचे दिसते; मात्र आम्ही ज्या हरकती आणि सूचना केल्या त्याचा काहीही अंतर्भाव या प्रभाग फेररचनेत केलेला नाही, असे मुंबईतील अनेक प्रभाग महायुतीच्या फायद्यासाठी विभागण्यात आले आहेत.
- मोहसिन हैदर, प्रवक्ते, काॅँग्रेस
------------
वरळीतील प्रभागरचना गेल्या निवडणुकीपूर्वी झाली. आम्ही हरकती घेतल्यानंतर तेव्हा सुधारणा करण्यात आली. या वेळी या भागातील प्रभागरचना कायम ठेवली आहे. मात्र मुंबईत काही माजी नगरसेवकांनी ज्या हरकती-सूचना केल्या त्यांचा अंतर्भाव करण्याची गरज होती. अनेक भागांत त्याविषयी नाराजी आहे.
- किशोरी पेडणेकर, माजी महापौर
------------------
अंतिम प्रभागरचना संकेतस्थळावर
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५साठी अंतिम करण्यात आलेली प्रभागरचना शासन राजपत्रामध्ये आणि महापालिका संकेतस्थळावर https://mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCElectio2025 या लिंकवर प्रसिद्ध केली आहे किंवा https://mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCElectio2025 या संकेतस्थळावर क्लिक करा.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.