विरार, ता. ७ (बातमीदार) : वसई-विरार परिसरातील बिकट रस्त्यांच्या स्थितीवरून बहुजन विकास आघाडीने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत निवडणुकीपूर्वीच शक्तिप्रदर्शन एका बाजूला केले, तर दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकीनंतर शांत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे काम केले आहे. विधानसभा निवडणुकीपासून शांत असलेल्या बविआने पालिका निवडणुकीचे या मोर्चाच्या माध्यमातून रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत बविआचे तिन्ही आमदार पराभूत झाल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांत काहीशी बॅकफूटवर गेलेल्या पक्षाने रस्त्यावरील खड्डे यासह अन्य नागरी समस्यांविरोधात रणशिंग फुंकले. या मोर्चात सर्व नगरसेवक, नगरसेविका, हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील झाल्याने त्यांच्यामध्ये जोश निर्माण करण्याचे काम केले. या मोर्चाच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीने शांत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जव्हारी लागल्याने आणि ईडीची टांगती तलवार असल्याने हा पक्ष कोमात गेल्याची टीका विरोधक करत होते. त्याचवेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी धारण केलेले मौनव्रत कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकत होते, परंतु या मोर्चामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र मिळाली आहेत. निमित्त रस्त्यांवरील असंख्य खड्ड्यांचे असले तरी यातून प्रशासन आणि आमदारांवर निशाणा साधून पुन्हा एकदा पालिकेवर पकड मजबूत करण्याचे धोरण बविआने आखल्याचे दिसत आहे. त्यातच बविआ सत्तेमध्ये असताना पालिकेने ४०० कोटींची एफडी केली होती. ती प्रशासनाने चार वर्षांत तोडल्याचा आरोप करून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न बविआने केला आहे.
निवडणूक जस जशी जवळ येऊ लागेल, तस तसे आरोप-प्रत्यारोप होत राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेली बविआ आता पुन्हा नव्या जोमाने पालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत असल्याचे सिद्ध झाले आहे. तरुणाईबरोबरच आपल्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याच्या तयारीत असल्याने पालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.