अंबरनाथमध्ये महिलाराज कायम
नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित
अंबरनाथ, ता. ७ (बातमीदार): बदलापूरपाठोपाठ अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष होण्याचा मान महिलांना मिळणार आहे. मुंबई येथे मंत्रालयात सोमवारी (ता. ६) राज्यातील नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून, अंबरनाथचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ठेवले आहे. ही घोषणा शहरात मोठ्या उत्साहासह स्वागत केली जात आहे.
२०१९ मध्ये संपुष्टात आलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोरोना महामारी आणि इतर कारणांमुळे निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या; मात्र आता प्रशासनाने निवडणुकीच्या रणधुमाळीस वेग दिला असून, आगामी काळात अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला गटातून निवड होणार आहे. यामुळे महिलाराज येणार आहे.
महिला प्रभाग आरक्षणाची सोडत बुधवारी (ता. ८) पालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबरला संबंधित आरक्षण जाहीर होणार आहे. तसेच ९ ते १४ ऑक्टोबरदरम्यान हरकती व सूचना सादर करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. या तारखांपर्यंत इच्छुक उमेदवारांनी आपल्या हरकती नगरपालिकेत सादर कराव्यात. अंबरनाथमध्ये सुमारे सहा वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे निवडणुका केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे; मात्र नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे अनेक पुरुष इच्छुकांचे स्वप्न तुटले आहे.
२०१५ मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ५७ सदस्य होते. त्यानंतर २०१९ मध्ये लोकप्रतिनिधींची मुदत संपुष्टात आली. यंदा होणाऱ्या पॅनेल पद्धतीच्या निवडणुकीत सदस्य संख्या ५९ झाली आहे. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रज्ञा बनसोडे यांनी पहिले अडीच वर्षे, तर मनीषा वाळेकर यांनी पुढील अडीच वर्षे नगराध्यक्षपद सांभाळले. आता पुन्हा नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाल्याने अंबरनाथमध्ये महिलाराज कायम राहणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना महिला नेतृत्वाकडून प्रगतीची अपेक्षा आहे.
नवा अध्याय
नगरपालिकेत काही पदांवर महिला अधिकारी कार्यरत असल्यामुळे खऱ्या अर्थाने महिलाराजला बळकटी मिळणार आहे. या निर्णयामुळे शहरातील महिलांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुढे येण्याचा मोठी संधी मिळणार आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या महिलेच्या नेतृत्वाखाली शहर चालेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही महिला सत्ताधारी राजकीय वातावरणातही सकारात्मक बदल घडवेल, अशी चर्चा सुरू आहे. शहरातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये महिला सत्तेचा नवा अध्याय सुरू होण्यास तयार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.