जोगेश्वरीतील इमारतीला भीषण आग
२७ जणांची सुटका; १७ जण रुग्णालयात दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः जोगेश्वरी (पश्चिम) येथील एस. व्ही. रोडजवळील जेएमएस बिझनेस सेंटर या उंच इमारतीत गुरुवारी (ता. २३) सकाळी भीषण आग लागली. या आगीतून २७ जणांची सुटका करण्यात आली असून १७ जणांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना एचबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
इमारतीच्या नवव्या ते तेराव्या मजल्यावरील कार्यालयांमध्ये सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी आग लागली. आगीची तीव्रता झपाट्याने वाढली. काही मिनिटांतच आगीची भीषणता लक्षात आली. अग्निशमन दलाने तत्काळ दाखल होत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले. २७ नागरिकांची जवानांनी सुटका केली. त्यात १७ जणांना धुरामुळे त्रास होऊ लागल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना उपचार करून सोडण्यात आले. शर्थीचे प्रयत्न करीत दलाच्या जवानांनी आग दुपारी २.२० वाजता नियंत्रणात आणली. आग इलेक्ट्रिक वायरिंग, फॉल्स सीलिंग, एसी डक्ट, इलेक्ट्रिक डक्ट, फर्निचर, काचांच्या फसाड्स आणि ऑफिस रेकॉर्डपर्यंत मर्यादित होती. धूर इमारतीच्या अकराव्या ते तेराव्या मजल्यावर पसरल्याने या मजल्यावरील नागरिक गुदमरले. त्यामुळे त्या नागरिकांना तत्काळ अग्निशमन दलाने रुग्णालयात दाखल केले. दलाने २७ जणांना सुरक्षित बाहेर काढले, त्यात २५ पुरुष आणि दोन महिला आहेत.
...
नऊ जणांवर उपचार सुरू
बचावासाठी हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म व जिन्यांचा वापर करण्यात आला; मात्र तोपर्यंत १७ जणांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. यापैकी नऊ जण अद्याप रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. फैजल काजी (वय ४२), श्याम बिहारी सिंह (५८), मेहराज कुरेशी (१९), इक्बाल धनकर (६१), नदीम भाटी (४३), वसीम खान (२८), मृदुला सिंह (५७), सलीम जावेद (४८), अबू भाटी (६०) अशी उपचार घेत असलेल्यांची नावे आहेत.
...
जनजागृतीचा अभाव
अग्निशमन दलाचे माजी प्रमुख किरण कदम यांनी सांगितले, की हाईराईज टॉवरची नियमावली बदलत २४ वरून ३२ मीटर करण्यात आली आहे. बिल्डरधार्जिणी नियमावली झाली आहे. यामुळे छोट्या आगीतही जीवितहानी होत आहे. दुसरीकडे शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत आहेत. जुन्या वायरिंग बदलणे, वायरींवर अतिताण देणे, नादुरुस्त वायरिंग याबद्दलही जनजागृतीचा अभाव दिसत आहे.