अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना ‘गंधार गौरव पुरस्कार'' जाहीर
ठाणे, ता. २७ (बातमीदार) : हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर आपल्या चतुरस्त्र अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बालदिनाच्या औचित्य साधून १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे हा सन्मान निवेदिता सराफ यांना त्यांचे पती, सुप्रसिद्ध अभिनेते, पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराबाबतची माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कारामध्ये शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ११ हजार १११ इतकी रोख रक्कम देण्यात येणार आहे. गंधार संस्थेने मागील १० वर्षांपासून या गौरव सोहळ्याचे आयोजन केले असून, यंदाचे हे दहावे वर्ष आहे. आतापर्यंत या पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, अभिनेत्री विद्या पटवर्धन, अभिनेते दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि विजय गोखले यांचा सन्मान करण्यात आला आहे.
गंधार संस्थेने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘गंधार बालकलाकार पुरस्कार’ यंदा गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला जाहीर करण्यात आला आहे. तसेच यंदाच्या युवा पुरस्काराचे मानकरी म्हणून श्रेयस थोरात, शिवानी रांगोळे आणि शिवराज वायचळ यांची निवड झाली आहे. ‘संक्रमण, पुणे’ या बालनाट्य संस्थेला (संस्था प्रमुख यतीन माझिरे) यंदाचा बालनाट्य संस्था पुरस्कार घोषित केला असून, दरवर्षी एकांकिका सादर करणाऱ्या आय.एन.टी. (इंडियन नॅशनल थिएटर आर्ट) संस्थेलाही विशेष गौरव प्रदान केला जाणार आहे.
मे महिन्यात गंधारतर्फे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे झालेल्या गंधार बालनाट्य स्पर्धेत १५ बालनाट्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण हर्षदा बोरकर आणि अमोघ चंदन यांनी केले. पत्रकार परिषदेला प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन आणि पी. एन. पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.