खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका आजारी
गर्भवती महिलेच्या हेळसांडीनंतरही निष्काळजी कायम
खालापूर, ता. ३० (बातमीदार) ः खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे. तिची दुरुस्ती न झाल्याने केंद्राच्या आवारात उभीच आहे. विशेष म्हणजे, या रुग्णवाहिकेच्या अभावामुळे १९ ऑक्टोबर रोजी एका आठ महिन्यांच्या गर्भवती आदिवासी महिलेची दोन तासांहून अधिक वेळा हेळसांड झाली होती. तरीदेखील या गंभीर घटनेनंतरही आरोग्य विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही.
संबंधित महिलेला खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून अधिक उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्याची आवश्यकता होती, मात्र आरोग्य केंद्रासाठी नियुक्त १०२ क्रमांकाची रुग्णवाहिकेत बिघाड झाल्याने ती धूळखात पडून आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तिची बॅटरीसुद्धा चार्ज नसल्याने ती पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे संबंधित महिलेला दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांनी आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती, मात्र आजतागायतदेखील संबंधित रुग्णवाहिका नादुरुस्ती अवस्थेत आहेत. मागील काही वर्षात खालापूरमधील लोकसंख्या वाढत असताना प्रशासन मात्र मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत आहे.
................
खालापूर तालुक्याच्या ठिकाणी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे गरीब व गरजू नागरिकांसाठी मोठा आधार आहे. या ठिकाणी दररोज शंभराहून अधिक रुग्ण बाह्य रुग्णविभागात उपचारासाठी येतात. तसेच प्रसूती विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांमुळे परिसरातील वाडी-वस्तीतील कुटुंबांचा या केंद्रावर विश्वास आहे, मात्र आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना हलवण्यासाठी आवश्यक असलेली रुग्णवाहिकाच बंद असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेवर उपचार करण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
...............
रुग्णवाहिकेची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी किंवा सुस्थितीत असलेली दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. आरोग्य केंद्रातील निष्काळजीबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी सांगितले, तर १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या बिघाडाबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. दुरुस्ती प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खालापूर आरोग्य केंद्रासाठी ही रुग्णवाहिका अत्यंत गरजेची आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.