खालापूर नगर पंचायत पेयजल योजनेला आयआरबीची हरकत
शुद्ध पाण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर; नागरिक त्रस्त
खालापूर, ता. ३० (बातमीदार) ः खालापूर नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कलोते धरणातून खालापूर शहरासाठी सुरू असलेल्या नवीन पेयजल योजनेला मुंबई-पुणे महामार्गालगत जलवाहिनी टाकताना आयआरबी कंपनीने हरकत घेतल्याने काम ठप्प झाले आहे. त्यामुळे आधीच रखडलेली योजना पुन्हा अडथळ्यात सापडली आहे.
खालापूर शहरासाठी कलोते धरण आणि पाताळगंगा नदीवरून पेयजल पुरवठा करण्यात येतो, मात्र कलोते पेयजल योजना वारंवार नादुरुस्त होत असल्याने गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठा विस्कळित आहे. दुसरीकडे पाताळगंगा नदीतील पाणी दूषित असल्याने नागरिक हे पाणी फक्त दैनंदिन उपयोगासाठी वापरतात. या समस्येवर तोडगा म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, कलोते येथून खालापूरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले, मात्र महामार्गालगत जलवाहिनी टाकण्यासंदर्भात आयआरबीकडून परवानगी न घेतल्याने हे काम तात्पुरते थांबविण्यात आले आहे. परिणामी नागरिकांना पुन्हा एकदा तातडीच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.
...................
चौकट :
प्रचंड निधी उपलब्ध असूनही जलवाहिनीच्या कामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. सुरुवातीला ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे काम रखडले आणि आता आयआरबीने घेतलेल्या हरकतीमुळे प्रकल्प पुन्हा ठप्प झाला आहे. त्यामुळे खालापूरमधील अनेक नागरिकांना विकतचे पाणी खरेदी करावे लागत असून, काही जण विहिरींवरून पाणी आणत आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे शहरातील नागरिक स्थलांतर करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
.................
कोट :
पेयजल योजनेचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी आयआरबी पुणे कार्यालयात सतत पाठपुरावा सुरू आहे. मुख्य जलवाहिनीचे काम सध्या थांबले असले तरी अंतर्गत जलवाहिनीचे काम सुरूच आहे. खालापूरकरांना लवकरात लवकर शुद्ध पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे खालापूर नगर पंचायतीचे पाणपुरवठा सभापती किशोर पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.