पारदर्शक कारभारासाठी पालिकेला कायदेशीर नोटीस
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि सार्वजनिक निधीच्या गैरवापराविरोधात ‘सजग नागरिक मंच नवी मुंबई’ या संस्थेने महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ॲड. सुशांत जोशी यांच्यामार्फत पाठवण्यात आली असून, महापालिकेच्या अभियांत्रिकी, आरोग्य, शिक्षण, उद्यान आणि घनकचरा विभागांतील गैरप्रकारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मंचाच्या म्हणण्यानुसार, आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीतून कामे आणि खरेदी प्रक्रिया स्पर्धारहित व मनमानी पद्धतीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून, खर्च आणि निविदांची माहिती सार्वजनिक करण्यास हेतूपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मंचाने केला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला असून, सार्वजनिक निधीचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. जर याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही, तर नागरिकांच्या हक्कांसाठी न्यायालयीन लढा उभारला जाईल, असा मंचाकडून इशारा देण्यात आला आहे.
..............
नेरूळ उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षकांची मागणी
नेरूळ, ता. ३० (बातमीदार) ः नेरूळ वेल्फेअर फेडरेशन आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या शिष्टमंडळाने नेरूळ येथील उद्यानांमध्ये वाढत्या गैरप्रकारांबाबत नवी मुंबई महापालिकेकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात सार्वजनिक उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षकांची तातडीने नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनुसार, अनेक उद्यानांमध्ये दिवसाढवळ्या दारू पिणे, गांजा सेवन करणे आणि अनैतिक कृत्ये सुरू असतात. रात्रीच्या वेळी ही ठिकाणे असामाजिक घटकांचा अड्डा बनली आहेत. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे महिलांनाही असुरक्षितता जाणवत आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून प्रत्येक उद्यानात किमान दोन सुरक्षा रक्षक नेमावेत, तसेच सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी सार्वजनिक उद्यानांचा वापर मूळ उद्देशानुसार व्हावा, यासाठी संबंधित विभागाने तत्काळ पावले उचलावीत, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
................
नेरूळमधील बुद्धांच्या मूर्तीच्या संरक्षणाची मागणी
नेरूळ, ता. ३० (बातमीदार) ः नवी मुंबईतील ज्वेल ऑफ नवी मुंबई, येथे स्थापित गौतम बुद्ध मूर्तीच्या दीर्घकालीन संरक्षणाची नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष संतोष सुतार यांनी महापालिका आयुक्तांना मागणी केली आहे. सुतार यांनी सांगितले की, सध्याची मूर्ती फायबरची असून, ती टिकाऊ नाही. त्यामुळे मूर्ती नैसर्गिक दगड किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या साहित्यापासून तयार करण्यात यावी. परिसराचे नाव ‘तथागत गौतम बुद्ध उद्यान’ असेच ठेवावे, कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव जोडून वाद निर्माण करू नये, अशीही मागणी करण्यात आली. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि २४ तास सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे सुचवले आहे. सुतार यांनी म्हटले की, मूर्ती हे शांतीचे प्रतीक असून, तिचे सौंदर्य व पावित्र्य जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. महापालिकेने या संवेदनशील विषयावर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
....................
दिवाळी अंक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
नेरूळ (बातमीदार) ः जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित दिवाळी अंक प्रदर्शन २०२५ चे उद्घाटन बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण १०२ विविध विषयांवरील दिवाळी अंकांचे हे प्रदर्शन आठवडाभर चालणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, सुभाष कुलकर्णी, डॉ. अनुराधा बाबर, संजय बनसोड, प्रभाकर गुमास्ते, रणजीत दीक्षित, तसेच शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रसंगी शब्दालय २०२५, या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. उद्घाटनावेळी डॉ. शिंदे यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, डिजिटल युगात वाचन हेच व्यक्तिमत्त्व विकासाचे खरे साधन आहे. त्यांनी ग्रंथालयासाठी नेरूळमधील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवनात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. प्रशांत पाटील यांनी ग्रंथालयाला अधिक बळकटी देण्यासाठी महापालिकेकडून अनुदान देण्याची मागणी केली. प्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.