बेस्टच्या खासगीकरणाविरोधात आंदोलन
मुलुंड, ता. ३० (बातमीदार) ः भांडुप परिसरातील बेस्ट बससेवा अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे भांडुप रेल्वेस्थानकाजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. अलीकडेच बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने प्रवाशांना तासन्तास बससाठी थांबावे लागत आहे. त्यातच कोणतीही पूर्वसूचना न देता नफ्यात चालणाऱ्या मार्गांवरील सेवा बंद केल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. भांडुपमधील बसमार्ग क्रमांक ६०८ आणि ६१२ पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत, तर ६०५ आणि ६०६ या सेवाही १ नोव्हेंबरपासून बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय ६०७ क्रमांकाची बस आता केवळ शिवाजी तलाव ते भांडुप स्थानकादरम्यान चालवली जात आहे. या अचानक बदलांमुळे प्रवाशांना मोठा फटका बसला असून, पर्याय म्हणून रिक्षांचा वापर वाढला आहे; मात्र रिक्षाचालकांची मनमानी आणि वाढलेले भाडे यामुळे सामान्य नागरिकांचे हाल वाढले आहेत.
शिवसेनेचा आरोप आहे, की बेस्ट प्रशासन जाणूनबुजून तोट्याचा दाखला देत बससेवा कमी करून खासगीकरणाचा मार्ग मोकळा करीत आहे. बेस्ट प्रशासनाने सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व विभागप्रमुख रमेश कोरगावकर आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी केले. स्थानिक नागरिक, शिवसैनिक आणि प्रवासी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. आंदोलनाद्वारे बेस्ट प्रशासनाने बंद बससेवा तत्काळ सुरू करावी आणि खासगीकरणाच्या प्रयत्नांना आळा घालावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.