मुंबई

सहकाराबाबतचा अहवाल सरकारला देऊ

CD

सहकाराबाबतचा अहवाल सरकारला देऊ
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची ग्वाही

मुंबई, ता. ३ : राज्यात सध्या सहकाराची अवस्था गंभीर आहे. त्याला सध्याची नेतेमंडळीही जबाबदार आहेत. त्यामुळे राज्य सहकारी संघाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपण राज्यभर फिरून परिस्थितीचा अभ्यास करून, सहकारातील सद्य:स्थिती आणि त्यावरील उपाययोजना यांचा अहवाल राज्य सरकारला देऊ, अशी ग्वाही राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी आज येथे ‘सकाळ संवाद’ या विशेष कार्यक्रमात दिली.
राज्यात आज सहकार क्षेत्राची अवस्था गंभीर आहे. एकेकाळी वेगवेगळ्या सहकारी संस्थांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारावर अवलंबून होती. तिची गावाशी नाळ जुळलेली होती; मात्र हल्ली सहकाराकडे जसे लक्ष द्यावे तसे दिले जात नाही. सहकारी साखर कारखाने आजारी पडतात; मात्र ते कारखाने खासगी झाले की नफ्यात येतात. आमच्यातीलदेखील सहकाराची प्रवृत्ती मेली आहे. सहकारी बँका बंद पडत आहेत. ५०० पैकी २५० नागरी सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही दरेकर यांनी दिली.
राज्यातील ७० टक्के लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने सहकाराशी जोडलेले आहेत. लोकांचे आर्थिक हितसंबंधही सहकारात गुंतले आहेत. त्यामुळे सहकार टिकणे आवश्यक आहे. आपल्याकडे खासगी क्षेत्राचा उदो उदो होतो. खासगी बँका मुंबईतून पैसे कमावतात; मात्र त्या कधीही सामान्यांच्या उपयोगाला आल्या नाहीत. गिरणी कामगारांना सरकारने घरे दिली; मात्र त्यासाठीचे १२ लाख रुपये त्यांना कोणतीही बँक कर्जाऊ देत नव्हती. कामगार आमच्याकडे आल्यावर त्यांना आपली घरे भाड्याने देण्यास संमती द्या, अशी विनंती मी अजितदादा पवार यांना केली. तसेच सह-कर्जदार म्हणून गिरणी कामगारांचा नातू आणि मुलगा यांना मान्यता द्यावी, अशीही मागणी केली. त्या दोन्ही मागण्या मान्य झाल्यावर आम्ही सहा ते सात हजार कामगारांना कर्जे दिली आणि आमचा एक पैसाही थकला नाही, अशी आठवण दरेकर यांनी सांगितली.
...
कर्जाचे पैसे थकवले नाहीत
माथाडी कामगारांना सरकारने भूखंड दिला; मात्र पैशांअभावी ते त्याच्यावर घरे उभारू शकत नव्हते. त्यांची पतसंस्था ही आमच्या बँकेची सदस्य होती. त्यामुळे आम्ही त्या पतसंस्थेला २५० कोटी रुपये दिले आणि त्यांच्यामार्फत ते पैसे माथाडी कामगारांना मिळाले. तेथे त्यांची घरे झाली व त्यांनीही एक पैसाही थकवला नाही. या सामान्य कामगारांना खासगी बँकांनी पैसे दिले नाहीत. अशा स्थितीत सहकार टिकला तरच लोक जगतील, असेही दरेकर यांनी आवर्जून सांगितले.
...
व्यापारी समाजाच्या उंचीचे होऊ या!
काही व्यापारी समाजाच्या इमारतींमध्ये मराठी माणसांना घरे मिळत नाहीत, याबद्दल छेडले असता हे चुकीचे आहे; पण ते टाळण्यासाठी मराठी माणसांना त्या रांगेत बसवणे आवश्यक आहे, यावर दरेकर यांनी भर दिला. एरवी मुंबईबाहेर वसई-विरार येथे जाणाऱ्या मराठी माणसांना आम्ही स्वयंपुनर्विकास योजनेत मोठी घरे देऊन इथेच थांबवले. हे आपण कृतीतून करून दाखवले. मराठी माणसांसाठीच्या अशा हिताच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. केवळ मराठी माणसासाठी बोलून काहीही होत नाही. एरवी मराठी माणसासाठी बोलणाऱ्या राजकारण्यांनी मुंबई या आर्थिक राजधानीत कोकणी, खानदेशी किंवा मराठवाड्याच्या पद्धतीचे जेवण देणारी हॉटेलसाखळी उभी केली का? मराठी माणसाच्या उत्कर्षाच्या योजना तयार केल्या पाहिजेत. मराठी माणसांना घरे न देणाऱ्यांची रेघ लहान करण्यापेक्षा आपली रेघ मोठी करण्याची गरज आहे. उगाच मारझोड, शिव्यागाळ नको. अंगावर आले तर मारामारी ठीक आहे; पण त्यांच्याशी स्पर्धा करा. मराठी माणसांना जागा नाकारणाऱ्यांच्या इमारतीत जाण्याचा आग्रह धरण्यापेक्षा आपल्या चार मोठ्या इमारती बांधा, असेही दरेकर यांनी सुचवले.
...
पालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर भर
आगामी महापालिका निवडणुकांचे चित्र काय राहील, असे विचारले असता आता विकासाभिमुख मुद्द्यांवरच सर्वांचा भर राहील, असे दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितले. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे आदी बदल गेल्या पाच-दहा वर्षांत झाले आहेत. मुंबई बदलत असून तिला बदलवणारे नेतृत्व राज्यात आहे. त्यामुळे असे बदल करणाऱ्यांना संधी द्यावी, अशी जनभावना आहे. इतरांना संधी मिळाली होती, आता त्यांनी १० वर्षे विश्रांती घेऊन बघत बसावे. भाजपवर लोकांचा विश्वास आहे. भाजपमध्येदेखील मराठी माणसेच आहेत. मराठीचा ठेका तुम्ही घेतला नाही. आम्हालाही मुंबईवर प्रेम आहे, आमच्याही रक्तात मराठीचा अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर नाव न घेता टीका केली.
केवळ राजकारणासाठी मराठी मराठी करू नका, तर मराठी माणसांच्या हितासाठी काम करा. इमोशनल टोमणे मारत बोलबच्चनगिरी योग्य नाही. ऊठसूट देवेंद्र फडणवीस यांच्यावर गलिच्छ शब्दांत टीका करावी, त्यांच्या शरीरयष्टीवरून शेरे मारावे, हे कोणालाही आवडत नाही. खुद्द माझ्या पत्नीलाही हे बोलणे आवडले नाही. यावरून ती टीका इतर सर्वसामान्यांनादेखील आवडणारच नाही, असेही दरेकर म्हणाले. एरवी कोणाविरुद्धही अर्वाच्य बोलणे सोपे आहे. त्याला काही शिक्षणाही लागत नाही; मात्र विकासावर बोलावे. ही मंडळी कधीही विकासावर किंवा शेतकऱ्यांवर बोलत नाहीत, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
सध्या सहकारी बँकांची अवस्था बिकट झाली असताना मुंबई बँकेला जे यश मिळाले तो आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, या मुद्द्यावर दरेकर म्हणाले, की मुळात तसे घेण्याची नेतृत्वाचीही इच्छा लागते. ठाणे जिल्हा बँकेने स्वयंपुनर्विकासात मुंबई बँकेचे अनुकरण केले आहे. पुणे, सातारा, नगर या जिल्हा सहकारी बँका अत्यंत सक्षम आहेत. जिथे जास्त निधीची आवश्यकता आहे तेथे आम्ही राज्य सहकारी बँकेबरोबर मंडळ तयार करीत आहोत. या अशा विकासाच्या बाबींसाठी नेतृत्वाची इच्छाशक्तीही हवी. मला फडणवीस यांनी पाठिंबा दिल्याने मी काम केले अन्यथा मी नाउमेद झालो असतो तर काहीही झाले नसते, असे दरेकर यांनी बोलून दाखवले.
...
केंद्रीय सहकार मंत्री महाराष्ट्र सक्षम करणार
अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार खाते केंद्रात सुरू केल्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला झाला आहे. एनसीडीसीने पुनर्विकासासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातील कायदेशीर अडचणींमधूनही आपण मार्ग काढला. आता गावातल्या पॅक्स सोसायट्या २० प्रकारचे उद्योग करू शकतील. शहा यांच्यामुळे सहकारी साखर कारखान्यांचे १२ हजार कोटी रुपये वाचले. महाराष्ट्र सक्षम करण्यासाठी अमित शहा वेगवेगळ्या कल्पना घेऊन येत आहेत, असे दरेकर यांनी दाखवून दिले.
...
शून्य व्याजदरात सर्वांचा फायदा
लाडकी बहीण योजनेसाठी आपण शून्य व्याजदराने कर्जे दिली; मात्र त्यातही मुंबई बँकेचा तोटा होणार नाही. उलट राज्य सरकार अनेक योजनांसाठी कर्जदारांना व्याजमाफी देते. त्या व्याजमाफीतून मुंबई बँकेला या व्याजाचे अनुदान मिळेल आणि मुंबई बँकेचा व्याजदर कमी असल्यामुळे राज्य सरकारचाही थोडा फायदा होईल, असे दरेकर यांनी दाखवून दिले.
...
कौशल्य विकास प्रशिक्षण
कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आमच्या माजी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची विनंती आपण कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना करणार आहोत. त्याचा फायदा घेऊन आमचे कर्मचारी गावागावात लोकांना सहकाराचे शिक्षण देऊ शकतील, असेही दरेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Latest Marathi News Live Update : मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Video: 'फक्त ७ तास...' टीम इंडियाच्या खऱ्या कबीर खानचा फायनलआधी स्पेशल मेसेज अन् विश्वविजयानंतर रोहितप्रमाणे मैदानात रोवला तिरंगा

Cancer Love Horoscope: कर्क राशीच्या प्रेम जीवनात आज काय खास घडणार? वाचा तुमचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT