साईबाबानगरमधील कारवाईला विरोध
पुनर्वसन करण्याची झोपडपट्टीवासीयांची मागणी
मालाड, ता. ६ (बातमीदार) ः कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या मागील साईबाबानगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी आपल्यावर झालेल्या झोपडीतोडक कारवाईबाबत उपायुक्तांची भेट घेऊन पुनर्वसनाची मागणी केली.
गेल्या ३० ते ४० वर्षांपासून सुमारे ७० झोपडपट्टीधारक आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत; परंतु दोन दिवसांपूर्वी आर वॉर्ड कार्यालयाने झोपड्यांवर तोडक कारवाई केली.
रिपाइं आठवले गटाचे मालाड विधानसभा अध्यक्ष सुनील गमरे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते मंगेश माने, अजय साक्लिया, संतोष राणा व रहिवाशांनी महापालिका उपायुक्त (परिमंडळ सात) संजय चंद्रभागा यशवंत कुऱ्हाडे यांची भेट घेतली. या वेळी शिष्टमंडळात रेश्मा सालगरे, रमाकांत देसाई, सुनील खारवा, कालिदास खारवा यांच्यासह इतर कार्यकर्ते व रहिवासी उपस्थित होते.
प्रशासन सकारात्मक
या भेटीत झोपडपट्टीवरील कारवाई तत्काळ थांबवून मार्च २०११च्या शासकीय नियमानुसार रहिवाशांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली. उपायुक्त कुऱ्हाडे यांनी रहिवाशांच्या अडचणींचा योग्य विचार करून पुनर्वसनाची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे व शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.