डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिन काळात रेल्वे कोच वाढवा
विधानसभा उपाध्यक्षांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. दरवर्षी त्यांच्या प्रवासाची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी महापरिनिर्वाण दिनाच्या पाच दिवस आधी येणाऱ्या आणि ६ डिसेंबरनंतर पाच दिवसांनी मुंबईतून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबरला येणाऱ्या लाखो अनुयायांमुळे मुंबईत रेल्वेवरील ताण वाढतो. हे लक्षात घेता मुंबईत दाखल होणाऱ्या रेल्वेसेवांमध्ये अधिक वाढ करण्याची गरज आहे. लोकांची प्रचंड गर्दी पाहता ये-जा करण्यासाठी रेल्वे प्रवासाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे, असे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
महापरिनिर्वाणदिनाच्या आधीच आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झाले तर मुंबईतील लोकलसेवेवरील भार कमी होईल, प्रवासाची गैरसोय होणार नाही. गर्दी न करता महापरिनिर्वाण दिनानंतर या अनुयांना सुखरूप प्रवास करता येणे शक्य होईल.
- अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
..