कपडा उत्पादकांची १३ लाखांची फसवणूक
दोघांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत उत्पादित होणारा कच्चा कपडा खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. अशाच एका प्रकरणात कपडा उत्पादकांकडून कच्चा कपडा खरेदी करून त्याचे पैसे न देता १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विकास रामअवतार अग्रवाल यांची खोणीगाव साईनाथ कॉम्प्लेक्स, पारोळ रोड येथे जय भवानी टेक्सटाईल्स नावाची कंपनी आहे. सुरत येथील व्यावसायिक रामदर्शन मारोठिया आणि अरविंद भाई या आरोपींनी कच्चा कपडा खरेदीसाठी सुरुवातीला विश्वासाचे व्यवहार केले. त्यानंतर २६ एप्रिल ते १५ मे दरम्यान त्यांनी ३३ रुपये प्रतिमीटर दराने ३८ हजार ६०२ मीटर कपड्याचे ३३६ तागे खरेदी केले; मात्र या व्यवहाराचे पैसे न देता आरोपींनी फिर्यादी विकास अग्रवाल यांची १३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. विकास अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून, सुरत येथील व्यावसायिक रामदर्शन मारोठिया आणि अरविंद भाई या दोघांविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.