पॅरामेडिकल तंत्रज्ञांना नोंदणी बंधनकारक
नव्या नियमाला युनियनचा तीव्र विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : महापालिकेच्या २१ रुग्णालयांतील पॅरामेडिकल तंत्रज्ञांसाठी राज्य पॅरामेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी अनिवार्य करण्याचे आदेश मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी दिले आहेत. प्रयोगशाळा, एक्स-रे, ईसीजी, ऑपरेशन थिएटर तसेच इतर तांत्रिक विभागात काम करणाऱ्या तंत्रज्ञांना आता विधिवत नोंदणी करावी लागणार आहे. राज्य शासनाच्या सूचनांनुसार नोंदणी कायद्यानुसार आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयाला म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनने जोरदार विरोध दर्शवला आहे.
म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या सहाय्यक सरचिटणीस रंजना आठवले म्हणाल्या, जे उमेदवार नियम निकषात मोडले आहेत अशांनाच महापालिकेच्या सेवेत पालिकेने सेवेत घेतले आहे. यापूर्वी नियम निकष घेण्यात यायला हवे होते. परिषद स्थापन होण्याआधी सेवेत असलेल्यांना का बंधनकारक करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आठवले यांनी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांना पत्र देत विरोध व्यक्त केला. त्यांच्या मते, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत तंत्रज्ञ हे नियमित कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना बाह्य नोंदणी संस्थेकडे जबरदस्तीने नोंदणी करण्यास भाग पाडणे योग्य नाही.
महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने सांगितले की, पॅरामेडिकल सेवेत कार्यरत असलेल्यांनी राज्य कौन्सिलकडे नोंदणी करणे हे कायदेशीर आणि गुणवत्तेचे निकष पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, रुग्णालयांतील प्रयोगशाळा आणि निदान विभागांमध्ये काम करणाऱ्या तंत्रज्ञांची योग्य नोंदणी केल्यासच रुग्णांच्या सुरक्षेची हमी आणि सेवांचा दर्जा सुधारता येईल. एकूणच, पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणीचा मुद्दा सध्या कायद्याचे पालन विरुद्ध संघटनात्मक विरोध अशा स्वरूपात पेटला आहे.