पत्रकार राणा अय्यूब यांना जीवे मारण्याची धमकी
कोपरखैरणे पोलिसांत गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात शोध पत्रकार आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या स्तंभलेखिका राणा अय्यूब एका अज्ञात आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी राणा अय्यूब यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्वरित अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
कोपरखैरणे सेक्टर १४ येथे राहणाऱ्या राणा अय्यूब यांना २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून वारंवार व्हॉट्सॲप कॉल येत होते. त्यांनी हे कॉल उचलले नाहीत. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हॉट्सॲपवर एक धमकीचा संदेश पाठवला. धमकी देणाऱ्याने राणा अय्यूब यांना ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये १९८४च्या शीख हत्याकांड आणि इंदिरा गांधींच्या खुनांचे समर्थन करणारे लेख लिहिण्यास सांगितले अन्यथा त्यांच्या घरी शूटर्स पाठवून ‘न्यू इयर साजरा’ करण्याची धमकी दिली.
धमकी देणाऱ्याने राणा अय्यूब यांच्या वैयक्तिक पत्त्याचा आणि कुटुंबासंबंधी माहितीचा उल्लेख करून भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राणा अय्यूब यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्हॉट्सॲपचा डिस्प्ले पिक्चर हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. राणा अय्यूब यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्वरित अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सायबर शाखेकडे सोपवला आहे.
पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट
‘गुजरात फाइल्स : ॲनाटाॅमी आॅफ अ कव्हर अप’ या चर्चित पुस्तकाच्या लेखिका असलेल्या राणा अय्यूब यांनी केंद्र आणि राज्य सरकारांच्या भ्रष्टाचार, अन्याय आणि दहशतवादाशी संबंधित विषयांवर सातत्याने निर्भीड भूमिका घेतली आहे. यापूर्वीही त्यांना समाजमाध्यमांवरून धमक्या मिळाल्या आहेत; परंतु या वेळी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने पत्रकारिता क्षेत्रात आणि समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक माध्यम संस्था आणि मानवाधिकार संघटनांनी राणा अय्यूब यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करून केंद्र सरकारने यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.