पाण्यासाठी वणवण
करंजाडेत कमी दाबाने पुरवठा, नोकरदारांना मनस्ताप
रवींद्र गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता. ६ ः एमजेपीकडून सिडकोला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे करंजाडे वसाहतीमधील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, सेक्टर ५, ६ येथील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
करंजाडे वसाहतीत ४०० सोसायट्या आहेत. येथे दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. या वसाहतीला सिडकोने २२ एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सद्यःस्थितीत १८ ते २० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याने वसाहतीतील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वसाहतीमधील सेक्टर ५, ६ मधील १४५ सोसायट्यांमधील रहिवासी सध्या या समस्येला सामोरे जात आहेत. विशेष म्हणजे, पावसाळा संपताच पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग आंदोलनाच्या तयारीत आहे.
़़़़ः------------------------------
राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष
सोसायटीच्या मागणीनुसार दिवसाला २० ते २५ टँकर पाणी सिडकोकडून दिले जात आहे, पण पाणी सोडल्यानंतर काही सोसायट्यांकडून मोटार लावून पाणी घेण्यात येते. त्यामुळे सेक्टर ५ व ६ येथील सोसायट्यांना पाणी पोहोचत नसल्याची ओरड रहिवाशांची आहे. महत्त्वाचे म्हणजे, वसाहतीमधील पाणी समस्येकडे राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
------------------------------
अधिकारी बैठकांमध्ये मश्गुल
करंजाडे वसाहतीकरिता पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता वीरेंद्र पाटील यांनी पाणी समस्याबाबत दोन दिवसांपूर्वी रहिवाशांसोबत बैठक घेतली होती. या वेळी पाणी समस्याबाबत विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच मुख्य जलवाहिनीवरून नळजोडणी, मीटरची स्वच्छता तसेच सोसायटीच्या मीटर भागात काही कचरा किंवा गाळ अडकला असून, तातडीने सफाई करण्याचे निर्देश दिले होते.
----------------------------------
टँकरवर भिस्त
सोसायट्यांमधील सर्व इमारतींना पुरेल इतका पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे करंजाडे वसाहतीतील पाणीपुरवठ्याची परिस्थिती पाहता नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. करंजाडे सेक्टर ५, ६ मधील जवळपास १४५ सोसायट्या पाणी समस्येला सामोरे जात आहेत.
------------------------------------
करंजाडेत पाण्याची समस्या गंभीर होत आहे. याबाबत सिडको अधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे, तिथे काय उपाययोजना करता येईल, याबाबतचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडे सुरू आहे.
- मंगेश शेलार, सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत
--------------------------
करंजाडे विभागाचा पदभार घेऊन १० दिवस झाले आहेत. वसाहतीमधील पाणी समस्येबाबत रहिवाशांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. त्यावर काय उपाययोजना करता येईल, याचे मार्गदर्शन केले आहे.
- वीरेंद्र पाटील, सहाय्यक कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, सिडको