रिक्षा-दुचाकी धडकेत एकाचा मृत्यू
कर्जत, ता. ६ (बातमीदार) ः कर्जतजवळील मोठे वेणगाव परिसरात गुरुवारी (ता. ६) दुपारी दुचाकी व ऑटो रिक्षा यांची समोरासमोर धडक झाली. श्रद्धा रिहॅब सेंटरजवळील वळणावर झालेल्या या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या बाळा अरुण वाघमारे (वय १६, रा. वेणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार संतोष मंगल हिलम (१९, रा. वाकस) गंभीर जखमी असून, त्याच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी दुचाकीस्वार संतोष हिलम यांच्या माहितीनुसार, दुचाकीचा टायर अचानक निसटल्याने वाहनाचा तोल गेला आणि दुचाकी रिक्षावर जाऊन आदळली. यात रिक्षाचालक वसंत मधुकर मुंडे (४४) आणि व प्रवासी आशा ज्ञानेश्वर केलटकर (५५) हे दोघेही जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे वळण धोकादायक असल्याने पूर्वीही येथे अपघात झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसवावेत, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.