चायनीज देण्यात उशीर झाल्याने तलवारीने हल्ला;
ठाण्यात दहशत माजविणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : वागळे इस्टेट परिसरातील मेंटल हॉस्पिटल सर्कल येथे चायनीज गाडीवरील कामगारांनी चायनीज देण्यास उशीर केल्याने एका चौकडीने गोंधळ घालत त्या कामगारांना मारहाण केली आणि भांडण सोडविण्यासाठी आलेल्या एका तरुणावर तलवारीने हल्ला केला. तलवारीने दहशत माजवल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२३ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री प्रथमेश दिनेश शिंदे (वय २९) यांच्या चायनीज गाडीवर आलेल्या दोन तरुणांनी चायनीज लवकर न दिल्याने वाद घातला. रस्त्यावरील लोकांनी त्यांना हाकलून दिले. काही वेळाने नीलेश माने (मुलुंड), संदीप जाधव, प्रेम जाधव, व रोहित जाधव (किसन नगर) हे चार तरुण पुन्हा आले आणि त्यांनी कामगारांना मारहाण केली. या वेळी नीलेश याच्या हातात तलवार होती, तर संदीपने लोखंडी झाऱ्याने कामगारांना मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या संदेश पाटील यांच्या डाव्या पायाच्या पोटरीवर नीलेशने तलवारीने हल्ला करून जखमी केले. यानंतर चौघांनी चायनीजची हातगाडी ढकलून उलटी केली आणि तलवारीने दहशत माजवत तेथून पळ काढला. या घटनेप्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.